चित्र संग्रहित
सांगोला : सचिन व्हटे
राज्यात सर्वात जास्त आवर्षणगस्त तालुका म्हणून आजही सांगोल्याकडे पाहिले जाते. पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याशी नेहमीच दोन हात करणार्या येथील शेतकर्यांनी डाळिंब उत्पादनात मोठी झेप घेतली आहे.परंतु डाळिंबावर येणारा तेला रोग आणि वाढत्या उत्पादनामुळे डाळिंब शेती ही आता तोट्याची ठरु लागली आहे, यावर पर्याय म्हणून सांगोला तालुक्यातील शिवणे येथील बाळासाहेब व दत्तात्रय जानकर या बंधुंनी शेततळ्यातील संरक्षीत पाण्याचा काटकसरीने वापर करुन सहा एकर क्षेत्रावर केशर जातीची आंबराई फुलवली आहे. मागील दहा वर्षापूर्वी आंबा लागवडीचे केलेले नियोजन आज त्यांना फायद्याचे ठरले आहे. मागील वर्षी त्यांचा आंबा लंडनच्या बाजारात गेला होता. यावर्षी तापमान अधिक असल्याने उशिराने आंबे काढणीस आले आहेत. तरीही यावर्षी 20 ते 22 टन आंब्याचे उत्पादन हाती येईल अशी त्यांना अपेक्षा आहे.
अकलूज – सांगोला राज्य मार्गावर शिवणे परिसरात बाळासाहेब जानकर यांची सुमारे 34 एकर कोरडवाहू शेती आहे. बहुतांश जमिन ही खडकाळ आणि चढ उताराची असल्याने फारसे उत्पादन हाती येत नव्हते, माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले बाळासाहेब व त्यांचे बंधू दत्तात्रेय यांना लहान पणापासूनच शेती मध्ये विविध प्रय़ोग करण्याची आवड होती. त्यातूनच त्यांनी डाळिंब बागे बरोबरच विविध फळबागा लागवड करण्याच निर्णय घेतला. वडीलोपार्जित त्यांच्या शेतात तीन ते चार आंब्यांची झाडे होती. त्यापासून त्यांना दरवर्षी चांगले आंबे मिळायचे. त्यातूनच त्यांना आंबा लागवडीची प्रेरणा मिळाली.
खडकाळ आणि माळरान असलेल्या शेतीला शाश्वत पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे त्यांनी सुरवातील शेतात 1 कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले. त्यानंतर 2010 साली सहा एकर क्षेत्रामध्ये15 बाय 15 अंतरावर देशी आंब्याच्या कोयांची लागवड केली. एक वर्षभरानंतर सुमारे 1 हजार 400 गावठी रोपांना केशर जातीच्या रोपांची कलमे केली. त्यानंतर चार वर्षांनी झाडांना फळधारणा सुरु झाली. लागवडी पासून जानकर यांनी आंब्याच्या झाडांना कोणत्याही प्रकारचे रासायनिक खात दिले नाही की फवारणी केली. केवळ जैविक खतांबरोरच सेंद्रीय खतांचा अधिक वापर केल्यामुळे झाडांना मोठ्या प्रमाणावर फळ धारणा झाली. शिवाय इतर बागेतील आंब्या पेक्षा त्यांच्या बागेतील आंब्याची चव वेगळी आहे.
गेल्या तीन वर्षापासून जानकर यांना आंबा बागेतून उत्पादन सुुरु झाले आहे. सुरवाती पासून त्यांनी आंब्याची विक्री व्यापार्यांना न करता ते स्वतः नैसर्गिक पध्दतीने आंबा पिकवून त्याची विक्री करतात. गेल्या वर्षी त्यांनी याच बागेतील 6 टन आंबा 130 रुपये किलो दराने झारखंड येथील व्यापार्या्च्या मध्यस्थीने लंडला पाठवला होता. तर उर्वरित जवळपास 20 ते 22 टन आंब्याची जागेवरती 70 रुपये किलो दराने विक्री केली होती.गेल्या वर्षी त्यांना पाच लाख रुपयांचा खर्च वजा जाता 14 ते 15 लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले होते.
नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहर येतो. दरम्यानच्या काळात आंब्यावर तुडतुडा,मावा, करपा,भुरी या सारख्या किटक व किडनाशकांचा प्रादुर्भाव होतो. त्यावेळी जानकर यांनी विविध प्रकारची जैविक खतांचा वापर करुन त्यावर मात केली आहे. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात तापमान अधिक असल्याने सर्वच फळबागांवर त्यांचा परिणाम झाला आहे. त्यांच्या आंबा बागेवर देखील झाला आहे. त्यामुळे यंदा उशिराने आंबा काढणीस आला आहे.
सध्या जानकर यांच्या बागेतील आंब्यांची काढणी सुरु झाली आहे. मागील महिन्यभरात जवळपास दोन टन आंब्यांची काढणी करुन विक्री करण्यात आली आहे.
जानकर यांनी बागे शेजारीच विक्री स्टाॅल लावला आहे. जागेवरूनच 70 रुपये किलो प्रमाणे विक्री केली जाते. दररोज किमान 30 हजार रुपयांची विक्री होते. रस्त्यावर स्टाॅल लावल्यामुळे ग्राहकांचाही प्रतिसाद चांगला आहे. जानकर हे आंबा काढणी नंतर गोठ्यात पाचटामध्ये पारंपारिक पध्दतीने आंब्याची आडी लावून पिकवतात. त्यामुळे नैसर्गिक पध्दतीने पिकवलेल्या आंब्याला मोठी मागणी आहे. आणखी एक ते दीड महिना आंबे काढणीचा हंगाम सुरु राहणार आहे. या काळात आणखी किमान 22 ते 23 टन आंब्याच्या उत्पादनातून 20 लाख रुपयांचे उत्पन्न हाती येईल अशी त्यांना आशा आहे.
खडकाळ माळरानात आंब्याची बाग यशस्वी झाल्यानंतर बाळासाहेब जानकर यांनी आणखी पाच एकर क्षेत्रावर हपूस,पायरी,वनराज या नवीन आंब्या बरोबरच चिक्कू, नारळ, पेरु, सिताफळ आदी विविध प्रकारच्या फळ झाडांची लागवड केली आहे. चिक्कू मध्ये अंतरपिक म्हणून केशर आंब्याची लागवड केली आहे. चिकूचेही उत्पादन सुरु आहे. बाळासाहेब जानकर व त्यांचे बंधू यांचे फळबाग लागवडीतील योगदान पाहता सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना 2016-17 मधील कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून पुरस्कार दिला आहे.
एकत्र कुटुंब पध्दतीने शेती करणार्या जानकरांना त्यांचा भाचा देवेन लवटे यांची ही मोठी मदत होत आहे. देवेन सांगोला येथे शिक्षक म्हणून काम करतात. सुट्टीच्या दिवशी ते ही आंबे विक्रीसाठी स्टाॅलवर येतात. त्यांच्याकडे विक्री व्यवस्थापनाचे कौशल्य असल्यामुळे सांगोला व परिसरातील अनेक लोक येथील पाडाचे पिकलेले आंबे खरेदीसाठी येतात. थेट शेतकरी ते ग्राहक विक्री सुुरु असल्यामुळे ग्राहकांचाही यामध्ये फायदा होत आहे. दुष्काळी भागातील शेतकर्यांनी जानकर बंधूंचा आदर्श घेवूनही आपल्याही मुरमाड व हलक्या शेतीमध्ये आंबा लागवड केल्यास जनकरां प्रमाणे इतर शेतकर्यांची ही शेती आंब्यासारखी शेती गोड होईल यात शंका नाही.
संपर्क शेतकरी- बाळासाहेब जानकर, मु.पो. शिवणे ता.सांगोला जि.सोलापूर मो.नं.7769827890
श्री बाळासाहेब जानकर रा .शिवणे यांची “अंबा लागवड व व्यवस्थापन” याविषयी मुलाकात उद्या सकाळी 7 वाजता साम Tv वर आहे तरी सर्वांनी ही मुलाकात अवश्य पहावी ..
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
.