जळगाव, दि. 29 : अरुणभाईंचे व्यक्तिमत्व म्हणजे कर्तृत्व आणि नम्रतेचा अनोखा संगम आहे. केवळ वक्तृत्वच नव्हे तर आचरणही श्रेष्ठ असणारे ते एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहेत,अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा गुणगौरव केला.
राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरात कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्री. गुजराथी यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास प्रमुख अतिथि म्हणून मुख्यमंत्री संबोधित करीत होते.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सा.ऊ.वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उज्ज्वलाताई पाटील,खासदार रक्षाताई खडसे, आमदार एकनाथराव खडसे, राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार सर्वश्री अमरिश पटेल, चंद्रकांत सोनवणे, संजय सावकारे, सुरेश भोळे, स्मिताताई वाघ, हरीभाऊ जावळे, चंदुभाई पटेल, डॉ. सतिष पाटील, चोपड्याच्या नगराध्यक्ष मनिषा चौधरी, कवी ना. धो. महानोर, माजी खासदार ईश्वरबाबू जैन, डॉ. गुणवंतराव सरोदे, चोपडा पिपल्स बॅंकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राजकारणात अनेक लोक भेटतात पण त्यातील काही मनावर छाप पाडतात, त्यातील अरुणभाई एक आहेत. समाजाला दिशा देण्याचे काम अरुणभाईंनी केले आहे, चांगले कर्तृत्व, वक्तृत्व आणि नम्रतेचा समन्वय असलेले दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणजे अरुणभाई होय. राजकीय जीवनात संयम कसा ठेवायचा हा पहिला धडा मी अरूणभाई गुजराथी यांच्याकडून शिकलो. नम्रतेने प्रत्येकाचे समाधान करणारे नेते असलेले अरूणभाई दिशादर्शन करतात, टिकाही चांगली करतात. चांगल्या सूचना करतात, अशी अरुणभाई गुजराथी यांची स्वभाव वैशिष्ट्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितली.
श्री. फडणवीस पुढे म्हणाले, मी विधीमंडळाच्या सभागृहात नवखा आमदार असतांना ते अध्यक्ष होते. त्यावेळी ते मला नेहमी प्रोत्साहन देत. माझे भाषण चांगले झाले की ते मला चिठ्ठ्या पाठवून कौतूक करीत. त्यांच्या चिठ्ठ्या आजही मी जपून ठेवल्या आहेत, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली. त्यांच्या कर्तृत्व आणि अनुभवाने मिळालेले ज्ञान त्यांनी नेहमी समाजाच्या हितासाठीच वापरले. त्यांच्याकडून असेच मार्गदर्शन लाभत राहो,अशी सदिच्छा व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी अरुणभाई गुजराथी यांना दीर्घायुष्य चिंतीले.
पेचप्रसंग सावधपणे हाताळण्याचे कसब – विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
राजकारणातील सालस व्यक्तिमत्व म्हणून अरुणभाई गुजराथी आम्हाला आठवतात. आपल्या नम्र स्वभावाने ते साऱ्यांना आपलेसे करुन घेतात. याच बळावर त्यांनी विधीमंडळ सभागृहातील अनेक कठीण पेचप्रसंगही अत्यंत सावधपणे हाताळले.
सामान्य माणसाला आपलेसे वाटणारे अरुणभाई – चंद्रकांत पाटील
बऱ्याचदा कर्तृत्व आणि नम्रता या एका ठिकाणी पहावयास मिळत नाही. मात्र या गुणांचा समन्वय असणारे अरुणभाईंचे व्यक्तिमत्व हे नेहमीच आम्हाला मार्गदर्शक आहे. त्यांचे वक्तृत्व हे सामान्य माणसाला कोणताही विषय सोप्या पद्धतीने मांडणारे आहे. त्यामुळे ते सामान्य माणसाला नेहमीच आपलेसे वाटतात.
अरुणभाईंचे कार्य मार्गदर्शक – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
अरुणभाईंचे कार्य हे नेहमीच समाजाला मार्गदर्शक आहे. एकनिष्ठता हा त्यांचा गुण वाखाणण्यासारखा आहे. त्यांच्या समवेत काम करतांना आम्ही खूप शिकलो. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती कौतुकास्पद आहे.
प्रत्येक ठिकाणी आदर्श निर्माण केला – माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
पुण्याला शिकत असतांना मी आणि अरुणभाई एका वर्गात होतो. गांधीवादी संस्कारात वाढलेल्या अरुण भाईंनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही चोपड्याच्या नगराध्यक्षपदापासून केली. आणि नगराध्यक्षाची आदर्श कारकिर्द कशी असावी याचा आदर्श त्यांनी लोकांसमोर ठेवला. असा आदर्श त्यांनी ज्या ज्या पदावर काम केले तेथे निर्माण केला. राष्ट्रकुल संसदीय मंडळात लंडन येथे भारताची भूमिका त्यांनी प्रखरपणे मांडली. त्यांच्या अभ्यासूवृत्तीने आणि नम्र स्वभावाने त्यांनी अनेक ठिकाणी आपले कर्तृत्व सिद्ध केले.
साधी राहणी उच्च विचारसरणी हे वैशिष्ट्य- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे
अरुणभाई गुजराथी हे प्रत्येक काम बारकाईने आणि दक्ष राहून करतात. याचा अनुभव आपण सहकारी मंत्री म्हणून त्यांच्या सोबत घेतला आहे. राजकारणात साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. दुःखात धीर देणारे एक मित्र म्हणूनही मी त्यांना ओळखतो. त्यांचे हे जीवन गाणे असे अखंड सुरु रहावे.
एकनिष्ठेतेचे प्रतिक अरुणभाई- गुलाबराव पाटील
अरुणभाई गुजराथी म्हणजे राजकारणातील एकनिष्ठतेचे प्रतिक आहे. आपल्या नम्रतेने विरोधकाला शांत करुन आपलेसे करण्याची किमया त्यांच्याकडे आहे.
यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे, पोलीस अधिक्षक दत्तात्रय काराळे, पोलीस उपअधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड, तहसिलदार दीपक गिरासे आदी तसेच चोपडा परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुणभाई गुजराथी गौरव समितीचे डॉ. सतिष पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.






