लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघासोबत दुजाभाव केला जात असल्याचं समोर आलं आहे.
पाकिस्तानसोबत 4 जूनला भारताचा सामना आहे, मात्र टीम इंडियाला प्रॅक्टिससाठी पुरेशी जागाच दिली नसल्याचं उघड झालं आहे.
सरावासाठी आवश्यक सुविधा न दिल्याने टीम इंडियाने नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर वैतागलेल्या कर्णधार विराट कोहलीने मैदान सोडून दुसऱ्या जागेची चाचपणी केली.
टीम इंडियाला प्रॅक्टिससाठी मुख्य खेळपट्टीच्या बाजूला जागा देण्यात आली. मात्र या जागेत संपूर्ण टीमला सराव करणं शक्य नाही. ती जागा खूपच अपुरी आहे.
पण काल याच ठिकाणी पाकिस्तानी टीमला मात्र मोठी आणि भारदस्त जागा देण्यात आली होती.
पाकिस्तानला मोठी जागा दिली म्हणून नाही तर भारताला कमी जागेत प्रॅक्टीस करण्यास सांगितल्याने भारतीय टीम मॅनेजमेंटने नाराजी व्यक्त केली.
भारतीय टीम मॅनेजर कपिल मल्होत्रा यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबतच विचारणा केली.





