कथित गोसंरक्षकांच्या धुमाकूळामुळे ऑनलाईन व्यवहारांना पसंती
केंद्र सरकारने कत्तलीसाठी भाकड आणि दुभत्या जनावरांची आठवडी बाजारातील खरेदी विक्री करण्यावर बंदी आणल्यानंतर आता ऑनलाईन बाजार जोरात सुरु आहे. सरकारने घातलेली बंदी आणि स्वयंघोषित गोरक्षकांचा उच्छाद टाळण्यासाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी इंटरनेटवरील संकेतस्थळांचा वापर सुरु केला आहे. ओएलएक्ससारख्या संकेतस्थळांवर शेकडो गायींची विक्री सुरु आहे. ५० हजार ते २ लाख रुपयांना गायींची विक्री केली जाते आहे. इंडिया टुडेने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचे रहिवासी असलेल्या रवी शर्मा यांनी ७५ हजार रुपयांना त्यांच्याकडे असणारी देशी गाय विकली आहे. गाय विकताना शर्मा थोडे चिंतेत होते. गाय खरेदी करणारी व्यक्ती तिच्यासोबत नेमके काय करणार आहे आणि ती व्यक्ती कोणत्या समुदायाची आहे, हे शर्मा यांना जाणून घ्यायचे होते. अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्तीला गाय विकण्यात रस नसल्याचे शर्मा यांनी म्हटले.
गाजीपूरमधील भीम सिंह यांना त्यांच्या ३ गाय विकायच्या आहेत. भीम सिंह बाजारभावापेक्षा निम्म्या दराने गाई विकण्यास तयार आहेत. गायी आपल्या जवळ ठेवणे आता धोकादायक झाले आहे, असे भीम सिंह यांनी सांगितले. गोसंरक्षणाच्या नावाखाली गेल्या दोन वर्षांमध्ये मुस्लिम आणि दलित समुदायातील अनेकांना मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच राजस्थानातील भिलवाडामध्ये एका व्यक्तीचा गोरक्षकांच्या मारहाणीत मृत्यू झाला. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांची नावे समोर आली होती. याआधी दादरीमध्ये अखलाक नावाच्या व्यक्तीला जमावाने केलेल्या मारहाणीत जीव गमवावा लागला. घरात गोमांस असल्याच्या संशयावरुन अखलाकला मारहाण करण्यात आली होती.
मागील आठवड्यात पर्यावरण मंत्रालयाने पशूंच्या आठवडी बाजारात फक्त शेतीसाठी जनावरांची खरेदी-विक्री केली जावी, असा निर्णय घेतला होता. जनावरे कत्तलखान्यात जाऊ नये, यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला होता. पशूंविरोधातील क्रूरता संपवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र कट्टरतावादी हिंदू समर्थकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सरकारने पशूंच्या संदर्भात हा निर्णय घेतल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येते आहे. मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.





