सदाभाऊ खोत यांचे चर्चेसाठी आवाहन:-
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीमालास हमी भाव, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा, शेतकऱ्यांना ६० वर्षांनंतर निवृत्तीवेतन आदी मागण्यांसाठी आजपासून राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. तर अनेक ठिकाणी शेतकरी संपाला हिंसक वळण लागल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन करत राज्य सरकारने आता शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा. राज्य सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. मी राज्य सरकारच्या वतीने शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण देत आहे, असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारशी मंगळवारी झालेली अंतिम टप्प्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आजपासून शेतकरी संपावर गेले आहेत. त्यानुसार आज सकाळपासून शेतकऱ्यांनी आक्रमक होत पुणे-बंगळुरू मार्गावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रक अडवले. शिर्डीत शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून आंदोलन केले. नाशिकसह मनमाड बाजार समितीतही शुकशुकाट पाहायला मिळाला. नगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले. साताऱ्यात या संपाची पहिली ठिणगी पडली. काल रात्रीच दूध वाहतूक करणाऱ्या दोन टँकरच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. मनमाड टोलनाक्यावर भाजीपाला रस्त्यावर फेकण्यात आला. संपाच्या पार्श्वभूमीवर सातारा-पुणे महामार्गावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. लासलगाव येथे पोलिसांनी आठ शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. या संपाचे परिणाम पुणे आणि नवी मुंबई बाजार समितीत जाणवले. पुण्यात ५० टक्केच शेतीमालाची आवक झाली. तर नवी मुंबईतील वाशीत केवळ ५०० ट्रक शेतमालाची आवक झाली. संगमनेरजवळ शेतकऱ्यांनी २५ गाड्या रोखून धरल्या होत्या. नाशिक, नगर, साताऱ्यातील आठवडा बाजार बंद होते. सोलापूर बाजार समितीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत ट्रकचालकांना फुले देऊन संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. सोलापुरातील सांगोला येथे शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले होते. बारामतीतही आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. राज्यातील अनेक दूध संकलन केंद्रांवर संपामुळे दूध संकलन करण्यात आले नाही. दरम्यान, अनेक ठिकाणी शेतकरी संपाला गालबोट लागले. औरंगाबाद बाजार समितीत शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये वादावादी झाली. निफाडजवळ नैताळे येथे शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. शिर्डी-खिर्डीगणेश येथे शेतमालाचा टेम्पो पेटवून दिला.





