विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा गेली अडीच वर्षे आहे.
काँग्रेसमधील अस्वस्थ नेत्यांच्या यादीत भर; मुख्यमंत्र्यांच्या गुगलीने चर्चेला जोर
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजप नेत्यांचे गोडवे गायल्याचे प्रकरण ताजे असतानाच, ‘गेल्या सरकारपेक्षा आताचे मंत्री अधिक जवळचे वाटतात, असे विधान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल विविध तर्कवितर्क व्यक्त केले जाऊ लागले आहेत. त्यातच विखे-पाटील यांच्याबाबत भविष्यात काहीही घडू शकते, अशी गुगली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकल्याने संशय अधिकच बळावला आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे झालेल्या समारंभात विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर आपली मैत्री आहेच हे सांगताना आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली होती. गेल्या सरकारपेक्षा आताच्या सरकारमधील मंत्री अधिक जवळचे वाटतात हे विधान विरोधी पक्षनेत्यानेच केल्याने त्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा गेली अडीच वर्षे आहे. त्यातूनच सरकारच्या विरोधात विखे-पाटील काहीशी सौम्य भूमिका घेतात, असेही बोलले जाते. मध्यंतरी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत विखे-पाटील यांचे नगर जिल्ह्य़ातील कट्टर राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात यांनी या मुद्दय़ाला हात घातला होता. विरोधी पक्षनेतेच सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत नाहीत, अशी तक्रारच थोरात यांनी केली होती.
विखे-पाटील यांनी मैत्रीच्या संदर्भात उपस्थित केलेल्या मुद्दय़ाचा धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विखे-पाटील यांचे आमच्या पक्षात अधिक मित्र आणि स्वपक्षीयांमध्ये अधिक शत्रू असल्याचे उद्गार काढून अधिकच संभ्रमाचे वातावरण तयार केले. गेल्या सरकारमधील मंत्र्यांपैकी विखे-पाटील यांचा सारा रोख हा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर आहे हे स्पष्टच आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांची एकूणच भूमिका लक्षात घेता, पक्षाने राणे यांना फार काही महत्त्व द्यायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. यापाठोपाठ विखे-पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आहे.
पक्ष सोडणार नाही – विखे-पाटील
आपल्या मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावल्याबद्दल शिर्डीतील कार्यक्रमात आपण मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मी मंत्री असताना फडणवीस हे माझ्याकडे येत असत. आता ते मुख्यमंत्री असल्याने मी त्यांच्याकडे कामे घेऊन जातो. त्यांच्याशी मैत्री असल्याचा अर्थ आपण पक्ष सोडणार असे नाही, अशी सारवासारव राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नसून, विचारांशी प्रतारणा करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसची आज बैठक
पक्ष संघटना आणि भविष्यातील वाटचालींच्या संदर्भात आढावा घेण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ज्येष्ठ नेत्यांची उद्या बैठक बोलाविली आहे. या बैठकीत विखे-पाटील यांच्या भाजप प्रेमाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पक्षाचे १२ विविध विभाग बरखास्त करण्यात आले असून, नव्याने नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111










