12 Jul. 2017
पंढरपूर : ‘पंढरीच्या दारी, स्वच्छतेची वारी’ अंतर्गत चंद्रभागेच्या तिरावर हजारो हात स्वच्छता करण्यासाठी सरसावले. महास्वच्छता अभियानात मंगळवारी सुमारे १२ हजार लोकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभागी नोंदविला. स्वच्छता अभियानात सुमारे ६० टन कचरा वेगवेगळ्या ठिकाणी संकलित करण्यात आला.
आषाढी वारीनंतर जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेमार्फत पंढरपूर येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानास सकाळी सुरूवात झाली. यामध्ये शहरातील विद्यार्थी, युवक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. जिल्हा परिषदेचे ६१९५, वन विभाग ३००, महसूल व नगर पालिका ४९५०, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी ३००, पंढरपूर नगरपालिका ३००, स्वयंसेवक ४५०, हजार अधिकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. या पुढील काळात यात्रेपूर्वी व यात्रेनंतर देखील महास्वच्छता अभियान राबविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.










