पंढरपूर Live (विशेष प्रतिनिधी):- कोरोनाच्या भीतीने एकीकडे संपूर्ण जग जीवाच्या भीतीने भेदरून गेले आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या विषाणूपासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे, यासाठी रोज नवनवीन उपाययोजना व कडक पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्र राज्यात व सोलापूर जिल्ह्यात या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे लोकांना घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले असतानाही दुसरीकडे मात्र भीमा नदीवरील वाळू चोरांनी मात्र या परिस्थितीचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे. रात्री व पहाटे चंद्रभागेच्या पात्रातुन वाळु चोरी करण्याचा सपाटा वाळु माफियांनी लावल्याचे दिसुन येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकाला डिझेल पेट्रोल मिळणे मुश्किल असताना या वाळू माफियांना डिझेल व पेट्रोल कोठून मिळते? हा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
पंढरपूर तालुक्यातील व शहरातील अनिल नगर झोपडपट्टी, व्यास नारायण झोपडपट्टी, कुंभार गल्ली बंधारा, रेल्वे पुल, या भागातून भीमा नदीतून पिकअप व मोटरसायकल, ऑटो रिक्षा, एट हंड्रेड व गाढवा वरून रात्रीच्या बारा वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत चोरटी वाळू वाहतूक केली जाते. दिवसभर भीमा नदीच्या कडेला वाळू माफिया दारूच्या पार्टी व मटणावर ताव मारत वाळूचा साटपा करून घेत असतात. व रात्र झाली का वाळू वाहतूक चालू केली जाते.
नदीकाठावरील झोपडपट्टीत राहणार्या नागरिकांना या वाळू माफियांचा रात्रीच्या वेळी त्रास होत आहे. उन्हाळ्यामुळे झोपडपट्टीतील काही नागरिक, वयोवृद्ध , लहान मुले बाहेर रोडवर झोपलेली असतात भविष्यात या वाळूमाफिया यामुळे या भागात अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वाळू माफियांचा पोलीस व महसूल प्रशासन यांनी तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी या भागात राहणार्या नागरिकांतून केली जात आहे.
कोरोनाच्या आजाराच्या फैलाव रोखण्यासाठी एकीकडे प्रशासन गुंतलेले असताना प्रशासनातील काही जणांना हाताशी धरून अगदी दिवसाढवळ्या सुध्दा हा वाळूउपसा बिनधास्तपणे सुरू असतो. मात्र या सार्या घडामोडीत अक्कलकोट तालुक्यात जसा पिंटु नावाचा एक अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला तरुण पुढे दोन तालुक्याच्या सँड लॉबीचा हेड झाला होता… गोळी बारापर्यंत त्याची मजल गेली होती! तसेच छोटे छोटे पिंटू पंढरपूर शहरात निर्माण होण्यापासून रोखण्याची जबाबदारी पोलीस आणि महसूल प्रशासनाची आहे.
पासचा गैरफायदा!
भाजीपाला, दुध, दवाखाने व इतर अत्यावश्यक सेवेकरिता ग्रामीण भागात ग्रामीण जनजागृती समितीच्या वतीने पास देण्यात आले. शहरातीलही अनेकांना पास देण्यात आले आहेत. या पास मध्येही राजकारण शिरल्याने ग्रामीण सह शहरी भागात पास धारकांची संख्या मोठ्याने वाढली आहे. या पासचा गैरफायदा घेतला जात असल्याचे पहावयास मिळत आहे. कारण पास दाखवून काही नागरिक व टवाळखोर मंडळी विनाकारण भटकत असल्याचे पहावयास मिळत आहे. काही पास धारकांनी तर आपला पासचा गैरफायदा घेत पेट्रोल विक्री चा अनोखा धंदा सुरू केल्याचे सांगितले जात आहे.


