चंद्रपूर: महाशिवरात्रीनिमित्त वर्धा, वैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या वेगवेगळ्या घटनांत सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. यात एकाच कुटुंबातील तीन बहिणींचा समावेश आहे. मृतांत प्रतिमा प्रकाश मंडल (वय-२३), कविता प्रकाश मंडल (वय-२१), लिपिका प्रकाश मंडल (वय-१८) यांचा समावेश आहे.
दुसऱ्या एका घटनेत तुषार शालीक आत्राम (वय-१७), मंगेश बंडू चनकापुरे (वय-२०), अनिकेत शंकर कोडापे (वय-१८) यांचा मृत्यू झाला. वृत्तलिहेपर्यंत कविता मंडल आणि मंगेश चनकापुरे यांचे मृतदेह मिळाले. उर्वरित जणांचा शोध पथकांच्या माध्यमातून सुरू आहे.
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात प्रकाश मंडल कुटुंबीय राहतात. महाशिवरात्री असल्याने मंडल कुटुंबीयांनी गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथे जाण्याचा बेत आखला. चारचाकी वाहनाने प्रणव वसंत मंडल, पुनम प्रणव मंडल, प्रथमेश प्रणव मंडल, कल्पना प्रकाश मंडल, प्रतिमा प्रकाश मंडल, कविता प्रकाश मंडल, लिपिका प्रकाश मंडल आणि पल्लवी शंकर राहा हे आठही जण निघाले.
हरणघाट मार्ग खराब असल्याने मंडल कुटुंबीय गडचिरोली मार्गाने मार्कंडा येथे जाण्यासाठी निघाले. गडचिरोली मार्गाने जात असतानाच व्याहाड बूज मार्गावर वैनगंगा नदीचे पात्र त्यांना दिसले. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पात्रातच त्यांनी अंघोळीचा बेत आखला. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर एका झाडाखाली वाहन ठेवून सहाही जण वैनगंगा नदीकाठावर आले. प्रतिमा, कविता, लिपिका, प्रथमेश आणि पुनम हे वैनगंगा नदीच्या पात्रात अंघोळीसाठी उतरले.
याचदरम्यान पाचही जणांचा पाण्यात तोल गेला. ते पाण्यात बुडू लागले. त्याचवेळी नदीपात्राजवळ बसलेल्या प्रणव मंडल याने पाच वर्षीय प्रथमेशला पाण्याबाहेर काढले. अन्य चारजणी पाण्यात बुडाल्या. सुदैवाने पुनम मंडल पाण्यातील एका दगडाला अडकल्या. घटनेची माहिती प्रणव मंडल याने डायल ११२ वर दिली. याची माहिती मिळताच सावलीचे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांच्या पथकाने पुनमला पाण्याबाहेर काढले. मात्र, प्रतिमा मंडल, कविता मंडल आणि लिपिका मंडल या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. पोलिसांनी बोटीच्या माध्यमातून शोधकार्य सुरू केले आहे. वृत्तलिहेपर्यंत कविता मंडल यांचा मृतदेह मिळाला. प्रतिमा मंडल आणि लिपिका मंडल यांचा अद्याप शोध लागला नाही. तिघींचाही शोध घेण्यासाठी या परिसरातील नावाड्यांना पाचारण करण्यात आले आहे.
दुसऱ्या एका घटनेत राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील तीन युवकांचा वर्धा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. मृतांत तुषार शालिक आत्राम, मंगेश बंडू चनकापुरे आणि अनिकेत शंकर कोडापे यांचा समावेश आहे. महाशिवरात्रीनिमित्त चुनाळा येथील काही नागरिकांसोबत तुषार आत्राम, मंगेश चनकापुरे, अनिकेत कोडापे हे तिघेही अंघोळीसाठी वर्धा नदीवर गेले होते.
नदीपात्रात महिला एका बाजूला आंघोळ करीत होत्या. त्यामुळे हे तिघेही काही अंतरावर अंघोळ करीत होते. त्याचवेळी त्यांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही. तिघेही पाण्यात बुडाले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांच्याजवळ असलेला रामचंद्र रागी या युवकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्यांना वाचविण्यात यश आले नाही. या घटनेची माहिती चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी राजुरा पोलिसांचे आले. घटना बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तेथील पथकही आले. तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी आपत्ती विभागाकडून बोटीची व्यवस्था केली. बोटीद्वारे मृतदेहाचा शोध घेणे सुरू आहे. वृत्तलिहीपर्यंत मंगेश चनकापुरे याचा मृतदेह मिळाला. अन्य दोघांचा मृतदेह मिळाला नाही.