पांगरी : महागाव (ता. बार्शी) येथील एका घटनेत दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. १८ फेब्रुवारीला मध्यरात्री ही घटना घडली असून मृत गणेश अनिल सपाटे (वय २६, रा.
अलिपूर रोड, बार्शी) याचे रूपाली शंकर पटाडे (वय ३५, रा. बार्शी) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिचा पती शंकर उत्तम पटाडे (वय ४०) हा अडथळा ठरत असल्याने त्या दोघांनी त्याला संपवण्याचा कट रचला. मात्र, यात कट रचणाऱ्या गणेशचाही मृत्यू झाला. या प्रकरणी रूपाली पटाडे हिला पोलिसांनी अटक केली आहे.
पांगरी पोलिसांकडील माहितीनुसार, गणेश सपाटे याने आपल्या मित्रासोबत बाहेर दारू आणि जेवणासाठी जाण्याचा बहाणा केला. संध्याकाळी सहा वाजता चारचाकी गाडीतून तो त्याचा मित्र गणेश खरात याच्यासोबत शंकर पटाडेला घेऊन तिघे हॉटेल सम्राटमध्ये दारू पिण्यासाठी गेले. मद्यपान केल्यानंतर त्यांचा प्रवास धाराशिवच्या दिशेने सुरू झाला. मध्यरात्री महागाव येथील तलावाच्या पुलावर गणेश सपाटे आणि शंकर पटाडे गाडीतून उतरले आणि गाण्यांच्या तालावर नाचू लागले. यावेळी गणेशने शंकरला उचलून पुलावरून पाण्यात ढकलले. मात्र, त्यावेळी शंकरने गणेशच्या गळ्याला गच्च धरल्याने दोघेही पाण्यात पडले. त्यांचा मित्र गणेश खरात याने दोघांना शोधण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंनी शोधाशोध केली, पण दोघेही सापडले नाहीत. बऱ्याच वेळानंतर दोघेही न सापडल्याने तो गाडी घेऊन निघून गेला. या प्रकरणाच्या तपासावेळी रूपाली पटाडे हिने नवऱ्याला ठार मारण्यास गणेशला प्रवृत्त केले होते, अशी कबुली दिली आहे.
पती शंकर वारंवार तिला त्रास देत असल्यामुळे ती अस्वस्थ होती आणि आपल्या प्रेमसंबंधात तो अडथळा ठरत असल्याने तिने पती शंकरचा खून करण्यास सांगितल्याची बाबही तपासातून समोर आली आहे. या घटनेवरून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या जबाबांवरून निष्कर्ष काढत गणेशने शंकर पटाडेला ठार मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात स्वतःच मृत्युमुखी पडला. या प्रकरणी पोलिसांनी मयत गणेश सपाटे आणि कट रचणाऱ्या रूपाली पटाडे हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने तिला २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
प्रियसीच्या पतीला पुलावरुन खाली तलावात उचलून टाकताना प्रियकर स्वत: देखील पाण्यात पडला. दोघांनाही पोहायला येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांना त्यांचे मृतदेह १९ तारखेला सापडले. सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंतकुमार काटकर तपास करीत आहेत.