पंढरपूर: चारचाकी वाहनातून अवैधरीत्या गांजाची वाहतूक करणाऱ्या चौघांना पोलिसांनी पकडले आहे. कारवाई दरम्यान सहा लाख ४२ हजार ६८० रुपयांचा गांजा आणि एक चारचाकी गाडी असा एकूण १४ लाख ४२ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात एका पुरुषासह तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, रविवारी (ता. २३) रात्री पावणे दहाच्या सुमारास व्हीआयपी पेट्रोलिंग करताना पंढरपूर शहर पोलिसांना पंढरपूर- मंगळवेढा रस्त्यावर लिंगायत स्मशानभूमीजवळ रस्त्याच्या बाजूला एक पांढऱ्या रंगाची ह्युंडाई कंपनीची आय २० कार (एमएच- १३ बीएन-९६२२) संशयास्पदरीत्या उभी असलेली दिसून आली.
संशय आल्याने पोलिसांनी गाडीला गराडा घातला. यावेळी एक पुरुष आणि तीन महिला संशयास्पदरीत्या गाडीत बसल्याचे आढळून आले. त्यानंतर ही गाडी शहर पोलिस ठाण्यात आणून तपासणी केली असता, गाडीत सहा लाख ४२ हजार ६८० रुपये किमतीचा ३२ किलो १३४ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला.
याप्रकरणी संशयित आरोपी अमोल हणमंत पवार, सुरेखा प्रांत पवार (रा. गाताडे प्लॉट, पंढरपूर), मैनाबाई महादेव जाधव (रा. तुंगत, ता. पंढरपूर) व अक्काताई प्रल्हाद चव्हाण (रा. देगाव, ता. पंढरपूर) या चौघांवर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.