सोलापूर: न्यु पाच्छा पेठेतील अण्णा भाऊ साठे नगरातील नवनाथ युवक मंडळाच्या देवीच्या मंदिराचा दरवाजा उघडून तेथील दानपेटी व पितळीची भांडी, चांदीची मुर्ती चोरुन नेणाऱ्या दोघांना सदर बझार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केले आहे.
त्यांच्याकडील चोरीचे साहित्य देखील पोलिसांनी हस्तगत केले आहे.
संशयित चोरटे अनिल किसनसिंग कल्लावाले (रा. बापुजी नगर, सोलापूर) व अनिल अशोक झुंझारे (रा. उत्तर सदर बझार, लष्कर) या दोघांनी न्यु पाच्छा पेठ परिसरातील मातंग देवीच्या मंदिरातून दानपेटी व अन्य साहित्याची १८ ते १९ फेब्रुवारी दरम्यान चोरी केली होती. शांतीलाल भोलेनाथ साबळे यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली होती.
सहायक फौजदार औदुंबर आटुळे, पोलिस हवालदार राजेश चव्हाण, सागर सरतापे, संतोष पापडे, पोलिस शिपाई सागर गुंड, उमेश चव्हाण, हणमंत पुजारी, अनमोल लठ्ठे हे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत होते. सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास गस्त सुरु असताना संत तुकाराम चौकात रात्री ११च्या सुमारास दोघेजण दुचाकीवर (एमएच १३, जी ३३३७) संशयितरित्या थांबलेले दिसले.
पोलिसांनी त्यांना विचारले, त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण, त्यांच्याकडे लाल कपड्यात बांधलेले गाठोडे दिसले. त्याची चौकशी केली असता त्यात पितळीची भांडी, दानपेटी, चांदीच्या मुर्ती होत्या. त्यांना पोलिस ठाण्यात आणून विचारपूस केली, त्यावेळी त्यांनी मंदिरातील चोरीची कबुली दिली.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहायक फौजदार आटुळे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार संतोष पापडे, शहाजहान मुलाणी, सागर सरतापे, राजेश चव्हाण, सागर गुंड, अनमोल लट्टे, उमेश चव्हाण, हणमंत पुजारी, सोमनाथ सुरवसे यांच्या पथकाने पार पाडली.