सांगोला : पिकअप वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. पोटच्या मुलाचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी हंबरडा फोडला. ही घटना रविवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:४५ च्या सुमारास कमलापूर, ता.सांगोला येथे घडली. वेदांत विलास काळे (वय २) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अवताडे यांनी पोलिसात खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कमलापूर (ता. सांगोला) येथील मालक-चालक शिंगू ज्ञानेश्वर ऐवळे यांचा पिकअप उभा होता. दरम्यान, काल रविवारी सकाळी चालकाने पिकअप पुढे घेत असताना आजूबाजूच्या लोकांनी गाडीखाली लहान मुलगा असल्याचे ओरडून सांगितले. परंतु पिकअपमधील गाण्याच्या आवाजामुळे चालकाला लोक का ओरडतात हे समजले नाही. गाडीखाली असलेल्या वेदांत याच्या डोक्यावरून पिकअपचे चाक गेले.
पुढील महिन्यात होता वाढदिवस
वेदांत काळे याचा ८ मार्च रोजी दुसरा वाढदिवस होता. त्यानिमित्त घरात आनंदाचे वातावरण होते. नातेवाइकांनी त्याचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन केले होते, मात्र रविवारी अचानक वेदांतचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने काळे कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले