पंढरपूर शहरातील यमाई तलावात उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऋतिक शंकर कदम (वय-२३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि.२९) रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली. येथील पत्रकार शंकर कदम यांचा ऋतिक मुलगा होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने आपल्या मित्रांना भेटण्यासाठी बोलावले. मित्र येताच त्याने तलावात उडी घेत आत्महत्या केली. आज सकाळी त्याचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला असून या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये हंगामी कर्मचारी म्हणून कामाला होता. ऋतिक बुधवारी रात्री येथील यमाई तलाव परिसरात गेला होता. यावेळी त्याने आपल्या मित्रांनाही भेटण्यासाठी बोलावून घेतले होते. मित्र आल्यानंतर ऋतिकने काही न बोलता केवळ टाटा.. बाय करत लागलीच तलावात उडी घेतली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्याच्या मित्रांना धक्का बसला. यानंतर सोबतच्या मित्रांनी ही घटना त्याच्या घरी सांगितली. यानंतर कुटुंबीय व पोलीस याठिकाणी दाखल झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत बराच वेळ त्याचा शोध घेण्यात आला. मात्र ऋतिक आढळून आला नाही. यामुळे रात्री त्याचा शोध घेण्याचे थांबविण्यात आले होते.
आज सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरू केली. यावेळी ऋतिकचा मृतदेह सापडला. यानंतर त्याचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला होता. दरम्यान ऋत्विकने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.


