तुळजापूर: तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेली नवविवाहित वधू तुळजापुरातून दुसऱ्या चारचाकी वाहनातुन पसार झाल्याची घटना गुरुवारी ता. 30 सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, शहरातील दीपक संघानजीक नवविवाहित दांपत्य नातेवाईकांसह तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेले होते.
अचानकपणे चारचाकी वाहन तेथे आले. सदर वाहनात नवविवाहित वधू बसली आणि ते वाहन भवानी रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे भरधाव वेगाने नळदुर्ग रस्त्यावरील मंठाळकर धर्मशाळा तसेच हंगरगा रस्त्यापर्यंत चारचाकी वाहन वेगाने गेले.
येथील काही नागरिकांनी त्या वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तथापि ते वाहन सुसाट होते. विशेष म्हणजे काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांना सदरची नवविवाहित वधू घेऊन जाणारे वाहन धडकत होते. परंतु नवविवाहित घेऊन जाणारी चारचाकी वाहन कोणास न धडकल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, सदरची नवविवाहिता जळगाव भागातील होती. तुळजापूर पोलीस ठाण्यात त्यांचे काही नातेवाईक आलेले होते. तथापि त्यांनी येथे कोणतीही फिर्याद न देता गावाकडेच फिर्याद दाखल करू असे पोलिसांना सांगितले. चित्रपटात थरार व्हावा याप्रमाणे सदरची नवविवाहिता तुळजापुरातून पसार झालेली आहे.
सदरची नवविवाहिता पसार झाल्यानंतर तिचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आले होते. सदरची नवविवाहिता स्वतःहून दुसर्या चारचाकी वाहनातुन पसार झालेली आहे, असे नातेवाईकांकडून सांगण्यात आलेले आहे. जामोद जिल्हा जळगांव भागातील काही नागरिक आपल्याकडे आलेले होते त्यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दिलेली नाही.


