सांगली: बँक अधिकाऱ्यास चारचाकीतून बाहेर काढून मारहाण करत सोन्याची चेन, ब्रँडेड मोबाईल असा १ लाख ६० हजारांचा ऐवज चोरी करून पोबारा केला. संजयनगर पोलिस ठाण्यात संजय सदाशिव खांडेकर (वय ३८, अर्जुनवाड, ता.
शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल महादेव कोळी (साई मंदिरानजीक, ग्रीन पार्क, मिरज) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी कोळी हे मंगळवेढा येथे एचडीएफसी बँकेत कार्यरत आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास चारचाकीतून त्यांच्या घरी निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या चालकाने चारचाकीसमोर येऊन दुचाकी थांबवली. अनोळखीने वाहनाचा दरवाजा उघडून फिर्यादी राहुल कोळी यास बाहेर काढले, मारहाण केली.
त्यामुळे राहुल कोळी हॉटेल पालवीच्या दिशेने पळत गेले. त्यानंतर ही व्यक्ती फोनवर बोलत तेथेच थांबली होती. काही वेळाने फिर्यादी राहुल हे चारचाकी घेण्यासाठी पुन्हा तेथे आले. ते वाहनात बसताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी राहुल यांच्या गळ्यातील चार तोळ्याची चेन, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तिघांनी तेथून पलायन केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.


