पंढरपूर येथील कर्मयोगी विद्यानिकेतन कॉन्फरन्स हॉलमध्ये मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘तारुण्य टिकवायचंय ना?’ या विषयावरील मार्गदर्शन शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या कार्यक्रमाला महिला पालकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती नोंदवत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

हा कार्यक्रम ‘लायन्स क्लब ऑफ पंढरपूर ड्रीम’ आणि ‘कर्मयोगी विद्यानिकेतन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा सप्ताह २०२६-२७’ च्या पाचव्या पुष्पानिमित्त आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्वचारोगतज्ज्ञ (MBBS, MD) लायन डॉ. प्रियांका नीरज दोडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ. दोडके यांनी सुंदर, तरुण आणि निरोगी दिसण्यासाठी त्वचेची योग्य काळजी कशी घ्यावी, वाढत्या वयातही तरुण दिसण्यासाठीचे उपाय आणि दैनंदिन स्वच्छतेच्या सवयी यांवर सविस्तर माहिती दिली. यासोबतच, सनस्क्रीनचा वापर, योग्य आहार व जीवनशैली, चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग आणि मुरुम यावरील उपाय तसेच हंगामानुसार त्वचेची घ्यायची काळजी याबाबतही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सत्राच्या शेवटी महिला पालकांना तज्ज्ञांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली, ज्यामध्ये अनेक महिलांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
या उपक्रमाच्या प्रकल्प प्रमुख म्हणून ला. सीमा नलबिलवार यांनी जबाबदारी पार पाडली. हा संपूर्ण कार्यक्रम लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. शार्दूल नलबिलवार, सचिव ला. संध्या खिस्ते, खजिनदार ला. गणेश पाटील यलमार तसेच ला. ललिता कोळवले आणि कर्मयोगी विद्यानिकेतनच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या नियोजनाखाली यशस्वीपणे पार पडला.

