चिकलठाणा: वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या टायरखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयासमोरील चौकात घडली.
हा अपघात इतका भीषण होता, की महिलेचा मृतदेह क्रेन लावून काढावा लागला!
मालनबाई विनायकराव चौधरी (५०, सुंदरवाडी, केंब्रिज चौक) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री आठच्या सुमारास मालनबाई या जिल्हा रुग्णालयाजवळील चौकात रस्त्या क्रॉस करीत होत्या.
त्यावेळी वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या टायरखाली चिरडून मालनबाई यांचा जागीच मृत्यू झाला. ही बाब तेथील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी गंभीर जखमी मालनबाई यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. टिप्पर चालक प्रवीण पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणक यांच्यासह चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तब्बल तासभर लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या अपघातात मालनबाई टिप्परच्या मागच्या चाकाखाली आल्या. यामध्ये त्या चाकाखाली चिरडून ठार झाल्या. मृतदेह चाकाखाली अडकला होता. तब्बल अर्धा ते पाऊण तास मृतदेह टिप्परखाली होता. क्रेन लावून टिप्पर हलविल्यानंतर मालनबाईंचा मृतदेह काढण्यात आला. यंदाचा हा या ठिकाणावरील पहिला मोठा अपघात असल्याचे नागरिकांनी सांगितले.


