गडहिंग्लज : लग्नाच्या आदल्या दिवशी तो शेताकडे गेला…लवकर घरी न आल्याने त्याचा शोध सुरू झाला; परंतु तो न सापडल्याने पोलिसांत बेपत्ता झाल्याची वर्दी दिली. दरम्यान, काल सकाळी त्याचा विहिरीत मृतदेह आढळला. ही दुर्दैवी घटना भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे घडली. सचिन श्यट्याप्पा बंदी (वय ३२) असे मृतदेह आढळलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, रविवारी (ता. २६) सचिनचे लग्न होणार होते. त्यासाठी घरी गडबड सुरू होती. दरम्यान, शनिवारी (ता. २५) तो शेताकडे गेला. तो लवकर परत न आल्याने त्याचा शोध सुरू झाला. त्या दिवशी तो सापडला नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पोलिसांत बेपत्ता झाल्याची वर्दी दिली. त्याचा शोध नातेवाइकांनी सुरूच ठेवला होता. त्यावेळी भावकीच्या विहिरीत एक मृतदेह आढळला.
अधिक चौकशीत हा मृतदेह सचिनचा असल्याचे निष्पन्न झाले. शेताकडे जाताना पाय घसरून अथवा तोल जाऊन तो विहिरीत पडून बुडाल्याचे सांगण्यात आले. अल्पशी शेती असल्याने सचिन हा गावातीलच काजू कारखान्यात कामाला जायचा. कधी तरी पेंटिंगच्या कामालाही जात होता.
घरची परिस्थिती गरिबीची आहे. गावातील प्रतिष्ठितांनी त्याचा विवाह ठरविला होता; परंतु बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सचिनने स्वहिमतीवर नव्या घराचे बांधकामही पूर्ण केले आहे. लग्न झाल्यानंतर त्याची वास्तुशांती करण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले. त्याच्या मागे आई, भाऊ व बहीण असा परिवार आहे.


