कोरेगाव रहिमतपूर गावच्या हद्दीत मोर्याचा माळ नावाच्या शिवारात शेतातील उसाच्या काड्या वेचत असताना ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने वयोवृध्द महिलेचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ही हृदद्रावक घटना घडली.
या घटनेची नोंद रहिमतपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
कांताबाई म्हाळु सुर्यवंशी (वय 65, रा. रहिमतपूर) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र सोपान कोरे यांच्या फिर्यादीवरून किसन जयवंत सावंत (रा. नडशी ता. कराड) वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी राजेंद्र कोरे यांच्या शेतात उस तोडणी सुरू होती. यावेळी कांताबाई या मशीन मधील ऊसाच्या कांड्या जमा करत होत्या. याचवेळी ट्रॅक्टर चालक किसन सावंत याने ट्रॅक्टर मागे घेत असताना कांताबाई यांना इनफिल्डचा धक्का लागल्याने त्या खाली पडल्या. याची माहिती किसन याला न मिळाल्याने त्याने थेट ट्रॅक्टर मागे घेतल्याने कांताबाई ट्रॅक्टरखाली चिरडल्या गेल्या. ही घटना घडल्यानंतर खळबळ उडाली. यानंतर कांताबाई यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.


