नदीपात्र दुषित होणार नाही याची दक्षता घ्यावी …… विभागीय आयुक्त- एस. चोक्कलिंगम

Loading

 पंढरपूर दि. 04:  मा. उच्च्‍ा न्यायालयाच्या आदेशानुसार नदीपात्र दुषित होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. वारी कालावधीत व अन्य वेळी वाळवंट स्वच्छ राहील याकडे संबंधित यंत्रणांनी कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना पुणे विभागीय  आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या.
माघ वारी 2016 नियोजन आणि आढावा या संदर्भात पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, प्रांताधिकारी संजय तेली, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  एस.टी. राऊत उपस्थित होते.

विभागीय आयुक्त चोक्कलिंगम म्हणाले, मा.उच्च न्यायालयाने भजन व कीर्तनाठी ठरवून दिलेल्या मुदतीतच वाळवंटाचा त्या प्रयोजनासाठी वापर व्हावा. नदीपात्र, वाळवंट दुषित होणार नाही, वाळवंटात जनावरे धुणे तसेच तेथे वाहने जाणार नाहीत यासाठी नगरपालिका आणि पोलीस यंत्रणेने सतर्कता बाळगावी.  उघड्यावर शौचालयास बसू नये यासाठी जनजागृती करण्या बरोबरच संबंधीतांवर कारवाई करावी. नदीपात्रात सांडपाणी मिसळणार नाही याबाबत नगरपालिकेने दक्षता घ्यावी. तसेच सांडपाणी व्यवस्थापनाबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगरपालिकने एकत्रित आराखडा करुन त्यानुसार कार्यवाही करावी.  रेल्वे प्रशासनाकडील असलेल्या रिकामी जागा ताब्यात घेण्यात येणार असून या ठिकाणी भाविकांसाठी पार्किग, शौचालये उभारणीच्या कामाचे नियोजन करण्यात येणार आहे.
माघ वारीत पुरेशी शौचालय उपलब्ध करुन देण्यात यावीत.  मंदिर समितीने  नोंदणीकृत मठामध्ये पुरेशी शौचालये असल्याची खात्री करुन घ्यावी. ज्या ठिकाणी शौचालयांची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी शौचालये उपलब्ध करुन द्यावीत.  सफाई कामगारांच्या असलेल्या प्रश्नांबाबत सर्व संबंधितांची बैठक घेऊन यावर योग्यतो निर्णय घेण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.
            बैठकीत संबंधित विभागाकडील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उप प्रादेशिक अधिकारी न. स. अवताडे, तहसिलदार नागेश पाटील, मुख्याधिकारी शंकर गोरे, पोलीस निरिक्षक किशोर नावंदे, गट विकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे यांच्यासह सर्व संबंधीत विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *