तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे मुदतीत पूर्ण करावीत …. विभागीय आयुक्त- एस. चोक्कलिंगम

 पंढरपूर दि. 04:- तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सुरु असलेली कामे मुदतीत पूर्ण करावीत तसेच या कामांचा दर्जा व गुणवत्ताही राखावी अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या.
            तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, प्रांताधिकारी संजय तेली, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  एस.टी. राऊत उपस्थित होते.
विभागीय आयुक्त म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. या विकास आराखड्यातून होणारे रस्ते, शौचालय, पार्किंग व अन्य कामे मुदतीत पूर्ण करावीत. पार्किंगसाठी ज्या ठिकाणी भूसंपादनाची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी भूसंपादनाच्या कामास सुरुवात करावी. तसेच जिल्ह्यातील पालखी तळांचा विकास करण्यात यावा.  65 एकर येथे आणखी 40 एकर जागा उपलब्ध होणार असून या जागेचा विकास करतांना रस्ते, पार्किग याबाबत सविस्तर आराखडा तयार करावा.  प्रदर्शनामार्ग- शिवाजीचौक ते महाद्वार घाट रोड, काळा मारुती चौक ते इंदिरा गांधी भाजी मंडई रोड, भजनदास चौक ते सोलापूर रोड आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरास जोडणारे रस्ते या रस्त्यांच्या रुंदीबाबत संबंधित यंत्रणेशी चर्चा करुन निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगरपालिका यांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या शौचालयांची स्वच्छता ठेवण्याबरोबच त्यांची दुरुस्ती व निगा ठेवावी. शहरात सी.सी.टी. व्ही. उभारण्याबाबत सर्व संबंधित विभागाकडून तपासणी करुन याबाबत निर्णय घेण्यात येईल. मंदिर समितीने दर्शन मंडपातील शौचालय दुरुस्ती, पंखे, विद्युत पुरवठा दुरुस्ती व नुतनीकरण करुन घ्यावे.
जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले, मंदिर समितीमार्फत संतपीठासाठी 100 एकर जागा निश्चित करुन तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास शासनाकडून मान्यता मिळताच संतपीठाचे काम सुरु करण्यात येईल. मंदिर समितीमार्फत अद्ययावत हॉस्पिटल उभारण्याचा मानस असून हॉस्पिटलच्या जागेसाठी मंजुरी मिळताचा हे काम देखील सुरु केले जाईल
यावेळी उप प्रादेशिक अधिकारी न. स. अवताडे, तहसिलदार नागेश पाटील, मुख्याधिकारी शंकर गोरे, पोलीस निरिक्षक किशोर नावंदे यांच्यासह सर्व संबंधीत विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *