पंढरपूर दि. 06:-
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शासनामार्फत शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागू नये यासाठी शासन राबवित असलेले जलयुक्त शिवार अभियान हे त्याचे एक उत्तम उदाहरण असल्याचे प्रतिपादन सहकार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सह वीज निर्मिती प्रकल्पाचे, 130 टनी बॉयलरचे अग्निप्रदीपन सहकार मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री भारत भालके, बबनराव शिंदे, सुभाष देशमुख, नारायण पाटील उपस्थित होते.
सहकार मंत्री म्हणाले, राज्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाली असली तरी या परिस्थितीवर मात करुन शेतकऱ्यांना मदत करण्याचेच धोरण शासनाचे आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे येत्या पाच वर्षात राज्यात दुष्काळी परिस्थती राहणार नाही. मराठवाड्यात जलयुक्त शिवार अभियानाचे चांगले काम झाले आहे. सोलापूर जिल्ह्यानेही जलयुक्त शिवार अभियानात उल्लेखनीय काम केले आहे.
खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार भारत भालके यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. दुष्काळी भागाला पाणी मिळावे, या परिसरातील रस्त्यांची कामे व्हावीत अशी मागणी मंत्रीमहोदयांकडे त्यांनी केली.
भीमा कारखान्याचे चेअरमन खासदार धनंजय महाडिक यांनी कारखान्यामार्फत सुरु करण्यात आलेल्या विविध कामांची व प्रकल्पांची माहिती प्रास्ताविकात दिली.
समारंभास नानासाहेब महाडिक, कल्याणराव काळे, बी. ए. रुपनर, काकासाहेब देशमुख, सी. पी. बागल, प्रा. शिवाजी सावंत, कारखान्याचे कार्यकारी संचालक सदानंद ई.जी., व्हाईस चेअरमन सतीश जगताप यांच्यासह परिसरातील अन्य मान्यवर पदाधिकारी, कारखान्याचे संचालक आणि सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
