आषाढी, कार्तिकी वारी प्रमाणेच माघी वारी यशस्वी पार पाडावी -प्रांताधिकारी संजय तेली

                                                                     
पंढरपूर दि. 05:- 
आषाढी व कार्तिकी वारीप्रमाणेच माघी यात्रेत सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन यात्रा व्यवस्थित व सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी चोख पार पाडावी असे आवाहन प्रांताधिकारी संजय तेली यांनी केले.
माघी यात्रा 2016 नियोजन संदर्भात येथील सांस्कृतीक भवन येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.  बैठकीस तहसिलदार नागेश पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, पोलीस निरिक्षक किशोर नावंदे, मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे यांच्यासह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
माघी यात्रेत नगरपालिकेने शहर स्वच्छता, गटारे साफ सफाई तातडीने सुरु करावी. शहरातील धोकादायक इमारतीमध्ये वारकऱ्यांनी वास्तव्य करु नये अशा प्रकारचे फलक त्या ठिकाणी लावावेत अशा सुचना प्रांताधिकारी यांनी बैठकीत दिल्या. ते म्हणाले पालिकेने वाहनतळ, औषध फवारणी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, बोअर शुध्दीकरण व पाणी नमुने तपासणी, अग्निशमन व्यवस्था, यात्रा काळात स्वच्छ व शुध्द पाण्याचा पुरवठा करावा. तसेच मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयानूसार शौचालय व्यवस्था करावी. पोलीस विभागाच्या सहकार्याने शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम प्रभावीपणे राबवावी.
उपजिल्हा रुग्णालय व नगरपालिका आरोग्य विभागाने यात्रा कालावधीत पुरेसा औषध साठा उपलब्ध करुन  ठेवण्याबरोबरच तज्ञ डॉक्टरांचे पथकही कार्यरत ठेवावे. आरोग्य पथकातील डॉक्टर, अँम्बुलन्सची माहिती व त्याचे दुरध्वनी क्रमांक प्रशासनामार्फत उभारण्यात आलेल्या मदत केंद्रात द्यावेत. अन्न व औषध विभागाने हॉटेल, फेरीवाले, मठ व अन्य ठिकाणच्या प्रसाद वाटप केंद्रात भेसळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्युत वितरण विभागाने यात्रा काळात शहरात वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. वायर उघड्यावर ठेवू नये. एस टी महामंडाळाने जादा बसेसची व्यवस्था करावी. बसस्थानकावर भाविकांसाठी स्वच्छ व शुध्द पाणी आणि बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवावा. कृषि उत्पन्न बाजार समितीने जनावरांच्या बाजाराच्या ठिकाणी पशुवैद्यकीय सेवा तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी.  मंदिर समितीने भाविकांसाठी दर्शन मंडपात सर्व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारावेत. दर्शन रांग गोपाळपूरचे पुढे जात असते तसेच गोळपाळपूर येथे भाविकांची गर्दी होत असल्याने गट विकास अधिकारी यांनी गोपाळपूर येथे वैद्यकीय पथक कार्यरत ठेवून या ठिकाणीही भाविकांसाठी औषधोपचाराची सोय करावी.
या बरोबरच  सार्वजनिक बांधकाम, दूरसंचार, तहसिल, भीमा पाटंबधारे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उप प्रादेशिक परीवहन अधिकारी या विभागाचाही बैठीकीत  प्रांताधिकारी तेली यांनी आढावा घेऊन संबंधिताना सूचना दिल्या.
00000
शाळा, कॉलेज, आवारात
शौचालय उभारणीसाठी मागणी करावी

            पंढरपूर दि. 05:-   पंढरपूर शहर हगणदारी मुक्त व्हावे. वारीत येणाऱ्या भाविकांसाठी शौचालयाची व्यवस्था असावी, यासाठी शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालयाच्या आवारात उपलब्ध होणाऱ्या जागेत शौचालय बांधण्यात येणार आहेत.  यासाठी प्रांताधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतीक भवन येथे शहरातील शाळा, कॉलेजच्या प्रतिनिधी सोबत बैठक संपन्न झाली.  बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, पोलीस निरिक्षक किशोर नावंदे, मंदिरे समितीचे व्यवस्थापक विलास महाजन,  गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे व शाळा, कॉलेजचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहर स्वच्छ व हगणदारी मुक्तीसाठी शौचालय उभारणीचा हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ज्या शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालयाच्या आवारात शौचालय उभारणीसाठी जागा उपलब्ध आहे,  त्यांनी त्यांची शौचालय उभारणीची मागणी नगरपालिकेकडे तातडीने करावी. त्यांच्या कडून मागणी प्राप्त होताच अशा ठिकाणी मोफत शौचालय बांधून देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी तेली यांनी बैठकीत सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *