सोलापूर
– गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा चालविणारे मनोज कामतकर यांच्या रिक्षाचा
क्रमांक एमएच १३ एएफ ३८८५ असा आहे. याच क्रमांकाची आणखी एक रिक्षा शहरात
फिरत होती. पोलिसांच्या मदतीने त्यांनी अक्कलकोटमधून दुसरी रिक्षा शोधून
काढली. श्री. कामतकर यांच्या रिक्षाचा क्रमांक वापरल्याप्रकरणी दोघांवर
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैफन अब्दूल मुजावर (वय ४५, रा.
सरवदेनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर), जावेद दाऊद सय्यद (वय २६, ब्यागेहळ्ळी
रोड मार्केट, अक्कलकोट) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. मनोज
मधुकर कामतकर (वय ३९, बी पूनमनगर, ज्ञानेश्वरनगर परिसर, जुळे सोलापूर)
यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे.
श्री. कामतकर यांनी
सोलापूर शहरात त्यांच्या रिक्षाचा क्रमांक असलेली रिक्षा पूर्वी एकदा
पाहिली होती. ७ एप्रिल २०१६ रोजी श्री. कामतकर हे अक्कलकोट येथे स्वामी
समर्थांच्या दर्शनासाठी गेले होते. तिथे त्यांना त्यांच्या रिक्षाचा
क्रमांक असलेली रिक्षा दिसली. चालक सय्यद याच्याकडे त्यांनी चौकशी केली.
सय्यद याने मुजावर याच्याकडून रिक्षा घेतल्याचे सांगितले. श्री. कामतकर
यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातही चौकशी केली. शेवटी पोलिसात
धाव घेतली. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय
लिगाडे व त्यांच्या पथकाने अक्कलकोटमध्ये जाऊन सय्यद याची रिक्षा ताब्यात
घेतली. याप्रकरणात मुजावर आणि सय्यद या दोघांना अटक केली.
चोरीची रिक्षा?
मनोज
कामतकर यांच्या नावाने उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयात नोंद असलेल्या
रिक्षाचा क्रमांक जावेद सय्यद याने कसा वापरला? याचा शोध पोलिस घेत आहेत.
सैफन मुजावर याने चोरीची रिक्षा सय्यदला विकली असेल का? याचाही तपास चालू
असल्याचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय लिगाडे यांनी सांगितले.
