निर्भय मॉर्निंग वॉक’द्वारे संघर्षाचा इशारा

Loading

सांगली – अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ दबणार नाही, पुरोगामी विचार संपणार
नाहीत, निधडेपणाने संघर्ष करत राहू, असा इशाराच आज अंधश्रद्धा निर्मूलन
चळवळीच्या कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉकद्वारे दिला.

दुसऱ्या
अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आज सकाळी निर्भय
मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर,
पुरोगामी विचारवंत गोविंदराव पानसरे यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.
सकाळी आमराईजवळच्या हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे यांच्या पुतळ्याला
अभिवादन करून या ‘मॉर्निंग वॉक’चा प्रारंभ झाला. स्टेशन चौकातील महात्मा
गांधींच्या पुतळ्याला संमेलनाध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे, तर्कशील संस्थेचे
भोरासिंग यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. पुढे राजवाडा चौक, पटेल
चौकमार्गे पुन्हा आमराईजवळ निर्भय मॉर्निंग वॉकचा समारोप झाला.

यामध्ये
डॉ. दाभोलकरांचे पुत्र डॉ. हमीद आणि कन्या मुक्ता तसेच पानसरेंच्या स्नुषा
प्रा. मेघा पानसरे व नातू कबीर यांच्यासह अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश
पाटील, माधव बावगे, मिलिंद देशमुख, डॉ. नितीन शिंदे, संमेलनाचे
स्वागताध्यक्ष ॲड. के. डी. शिंदे, प्रा. संजय बनसोडे, ॲड. अमित शिंदे,
विकास मगदूम उपस्थित होते. या उपक्रमात संमेलनासाठी इतर राज्यातून आलेले
कार्यकर्ते, युवक, युवती, महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या
वेळी कार्यकर्त्यांनी आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, लडेंगे – जितेंगे,
विवेकाचा आवाज बुलंद करूया आदी घोषणा देण्यात आल्या. तसेच पानसरे, दाभोळकर
यांचे मारेकरी शोधण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल शासनाचा धिक्कार करण्यात
आला.

पानसरे, डॉ. दाभोलकरांचा खून मॉर्निंग वॉक करताना झाला. या
घटनेला ३२ महिने झाले. आम्ही निर्भय मॉर्निंग वॉक करून विचार संपणार नाहीत,
असा निधडेपणाने संदेश देत आहोत. समीर गायकवाडला अटक करून सरकारने पाने
पुसली आहेत. तो सुटला तर त्याची जबाबदारी सरकारची राहील. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत. त्यांना याचे गांभीर्य नाही.
– डॉ. हमीद दाभोलकर

मॉर्निंग
वॉक आणि संमेलनातून सर्वसामान्यांच्या भावना व्यक्त होत आहे. तपास
यंत्रणेचे काम योग्य नाही. एसआयटीने नवे पुरावे गोळा  केले नाहीत हे
संशयास्पद आहे. आजही अनेकांना धमक्‍या येत आहेत. अभिव्यक्ती
स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी संरक्षण घ्यावे लागते ही अधोगती आहे.
– प्रा. मेघा पानसरे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *