वाळवा परिसरात वादळी वाऱ्याने दाणादाण

वाळवा – सकाळी साडे नऊची वेळ. कालच्या पाऊस व वाऱ्याने परिसरात दाणादाण
उडाली. ठिकठिकाणी महावितरणच्या तारा तुटल्या आहेत. झाडे कोलमडली आहेत.
पत्रे उडाले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यासह किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला.
पावसापेक्षा वाऱ्याचा जोर मोठा होता. त्यात ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले.
पन्नासभर घरांवरील पत्रे उडाले आहेत. आंबा, नारळ, द्राक्षे या पिकांचे मोठे
नुकसान झाले आहे. तर अनेक जुनाट झाडे मोडली आहेत. इस्लामपूर रस्त्याला
संजय बाळासाहेब तुपे व युवराज बाळासाहेब तुपे यांच्या नव्याने बांधलेल्या
घरावरील पत्रे उडाले. हे पत्रे लगतच्या भास्कर तुपे यांच्या कौलारू घरावर
कोसळले. त्यात कौलारू घराचे मोठे नुकसान झाले आहे. राणी तुपे ही महिला
किरकोळ जखमी झाली. हाळ भागात भीमराव महादेव पाटील यांच्यासह इतरांच्या
शेडवरील पत्रे उडाले. संभाजी तातोबा माने यांच्या छप्परवजा शेड घराची भिंत
कोसळली. इस्लामपूर रस्त्याला दगडू जाधव यांचे गेल्या महिन्यात बांधलेले
पत्र्याचे शेड वाऱ्याने उद्‌ध्वस्त झाले. दूरध्वनी केंद्राजवळ बबन कृष्णा
पाटील यांचा तात्पुरता गोठा कोसळला. अहिरवाडी रस्त्याला जगन्नाथ मदने
यांच्या शेडवर झाड कोसळले.

मध्यवर्ती हुतात्मा चौकात असणारी
नित्याची वर्दळ कायमच होती.  सरपंच गौरव नायकवडी यांच्या कार्यालयावरून
चौकाकडे जाणारी एक विद्युत तार अचानक तुटून पडली. वर्दळीच्या ठिकाणी तार
तुटून पडल्यानंतर एकच कल्लोळ उडाला. दोन-चार दुचाकीस्वारांच्या अंगावर ही
तार पडताच भीतीने दुचाकीस्वारांनी चालत्या गाड्यांवरून उड्या टाकल्या.
सुदैवाने या तारेतून वीज प्रवाह सुरू नव्हता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी
तातडीने ती तार बाजूला केली.

येडेनिपाणीत दीड लाखाचे नुकसान
येडेनिपाणी
– परिसरात काल झालेल्या वादळी पावसाने एक घराचे आणि ५ जनावरांच्या शेडचे
पत्रे उडून गेले. या वादळी वाऱ्यात सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याचे
प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती तलाठी उदय चव्हाण यांनी माहिती दिली. पत्रे
५०० मीटर अंतरावर जाऊन पडले. सुनंदा बाबूराव गुरव, पांडुरंग हिंदुराव
गुरव, तानाजी शंकर गुरव, सुभाष बाबूराव शिंदे, लालासाहेब आत्माराम गुरव,
विनोद शंकर चावण यांचे नुकसान झाले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *