![]()
पंढरीत आलेल्या महिला भाविक चंद्रभागेत स्नान केल्यानंतर वाळूची पिंड करुन महादेवाची पुजा करीत असतात.मात्र सद्या चंद्रभागेच्या वाळवंटाची अवस्था भिषण झाली असुन अवैध वाळू वाहतुक करणार्यांनी अगदी खरडून वाळवंटातील वाळू ओरबडुन नेल्याचे दुदैवी चित्र दिसत आहे.एकीकडे राज्यशासन नमामी चंद्रभागे सारखे चंद्रभागेचे पावित्र्य राखणारे अभियान राबवीत असतानाच पंढरीतील स्थानिक प्रशासन मात्र वाळू चोरीेकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळेच आज महर्षी वाल्मिकी संघाने चंद्रभागेच्या पात्रात वाळुची पिंड तयार करुन प्रशासनास सदबुध्दी दे असे साकडे शंभू महादेवास घातले आहे अशी माहिती महर्षि वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेशअंकुशराव यांनी दिली आहे.
आज महाशिवरात्रीनिमित्त पंढरीत भाविकांची अलोट गर्दी झाल्याचे दिसून आले.स्थानिक भाविकही आज पहाटेपासून चंद्रभागेच्या पात्रात साचलेल्या पाण्यात डुबकी मार ण्यासाठी येत होते.यामध्ये महिला भाविकांची संख्या मोठी होती.चंद्रभागेच्या तीरी वाळूचा महादेव करुन त्याची पुजा करण्याचीही प्रथा आहे.मात्र वाळवंटात वाळूच नसल्याने महिलांना अक्षरश: गारगोटयांचा महादेेव करण्याची वेळ आली होती.एकेकाळी गुडघाभर पाय रुतणारी वाळू असलेल्या या वाळवंटाची सद्या भिषण अवस्था झाली असून जागोजागी मोठ मोठे खड्डे करुन वाळू चोरुन नेली जात आहे.चंद्रभागेच्या पात्रातच अनेक साधुसंताच्या समाधीस्थळे असुन या समाधी भोवतीही मोठ मोठे खड्डे पडल्याचे चित्र पहावयास दिसत आहे.एरव्ही आपल्या पुर्वजांचा पुण्यतिथी सोहळा समाधीच्या ठिकाणी करणारी ह.भ.प.मंडळीही याबाबत मौन बाळगून असल्याचे दिसून येते.तर अहोरात्र वाळू उपसा होत असतानाही प्रशासन मात्र हतबलतेने पहात आहे.त्यामुळे भाविकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
आजच्या या आंदोलनामुळे तरी शंभू महादेव प्रशासनास हा वाळू उपसा रोखण्याची सदबुध्दी देईल अशी आशा गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केली आहे.या अनोख्या आंदोलनात पुंडलीक परचंडे,बबलू बोराळकर,निलेश माने,समाधान अभंगराव,मारुती करकमकर,शिवराज ननवरे,संकेत परचंडे,सुरज कांबळे,अक्षय म्हेत्रे,रोहीत नेहतराव,विशाल माने,विठ्ठल करकमकर,प्रशांत परचंडे,पंकज अंकुशराव,आप्पा करकमकर,शरद कोरे तसेच महर्षी वाल्मिकी संघाचे पदाधिकारी व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

