![]()
2016 च्या प्रारंभी विधानपरिषदेच्या निवडणुकीत दणदणीत मताधिक्य घेत जिल्ह्याचे आमदार म्हणून निवडून आलेले आमदार प्रशांत परिचारक यांनी सर्वप्रथम आपल्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनी निवडून आल्यानंतर कोट्यावधींचा निधी पंढरपूर शहराच्या विकासासाठी आणण्याचं कसब दाखविलं तेंव्हाच एक ‘अभ्यासु नेतृत्व’ म्हणून त्यांच्याकडं का पाहिलं जातं याचं प्रत्यंतर त्यांच्या कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गजांना आलेलं होतं. यानंतर झालेल्या पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत आ. परिचारक गटाने दणदणीत यश मिळवले. याचपाठोपाठ झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत येथे असणारी आपली एक हाती सत्ता अबाधीत ठेवली. आणि या दोन्ही निवडणुकांमधील विजयानंतर आत्ता झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही विजयाची घोडदौड कायम राखत आ. परिचारक गटाने पंढरपूर शहर व तालुक्यातील राजकारणावर आपली पकड अधिक मजबुत केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या निवडणूकीमध्ये सर्वात अधिक चूरस कासेगांव गट व पिराची कुरोली या गणात होती. कासेगांव गटात आ.भालके यांचे पुत्र भगिरथ भालके हे परिचारक गटाचे जेष्ठ नेते व पांडूरंग कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतनाना देशमुख यांच्या विरोधात उभे होते. येथे शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही उमेदवारांमध्ये मोठी चूरस पहावयास मिळाली. वसंतनाना देशमुख यांनी पहिल्या काही फेर्यांमध्ये हजारो मतांनी घेतलेले लिड शेवटच्या काही फेर्यांमध्ये भगिरथ भालके यांनी तोडले होते परंतू शेवटी 325 मतांनी वसंतनाना देशमुख यांचा विजय झाला. पिराची कुरोली गणात सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे बंधू समाधान काळे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा तब्बल 406 मतांनी पराभव झाला. आ.परिचारकांनी ज्याप्रमाणे पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत कमळाला शहराच्या मातीत रुजवून फुलवण्याचा प्रयत्न यशस्वी केला तसाच यशस्वी प्रयत्न त्यांनी पंढरपूर तालुक्याच्या मातीत कमळ रुजवून ते फुलवण्यासाठी केला व यातही ते यशस्वी झाले आहेत.
पंचायत समितीच्या निवडणूकांमध्ये आ.परिचारक यांनी शिवसेनेला साथ देत भाळवणी गणात शिवसेनेकडून संभाजी शिंदे यांना उमेदवारी दिली होती. यामध्ये सर्वाधिक मताधिक्य घेत शिवसेना तालुका प्रमुख संभाजी शिंदे यांचा विजय झाला आहे. त्यांचा 3268 मतांनी दणदणीत विजय झाला आहे. सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे यांच्यासह आ.भालके यांना या निकालामूळे जबरदस्त धक्का बसला असून भाळवणी या कल्याण काळेंच्या बालेकिल्ल्यात कमळासह शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. फक्त विठ्ठल सहकारीचे संचालक राजूबापू पाटील यांनीच आपला भोसे हा गड शाबूत राखला आहे. त्या ठिकाणी भोसे गटात अतूल लाला खरात यांचा तर गणात त्यांच्या पत्नी प्रफुल्लता प्रभाकर पाटील यांचा विजय झाला आहे.
आ. परिचारकांकडे 7-12
पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटाच्या 7 गटांवर आमदार प्रशांत परिचारक यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापीत केले असून पंचायत समिती गणाच्या 12 गणांमध्येही विजय मिळवल्याने आ. परिचारक यांच्याकडे जि.प. चे 7 व पं.स. चे 12 अशा 7-12 जागा आहेत. राष्ट्रवादीकडे जि.प. 1 गट, पं.स. 2 गण, काँग्रेसकडे पं.स. 1 गण तर भीमा परिवाराकडे पं.स. 1 गण असा निकाल स्पष्ट झाला आहे.
राजुबापु पाटलांनी भोसे गड राखला
पंढरपूर तालुक्यातील भोसे गटातून जि.प. चे उमेदवार राष्ट्रवादीचे खरात अतुल लाला व पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवार पाटील प्रफुल्लता पांडुरंग हे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याने राष्ट्रवादीचे नेते राजुबापु पाटील यांनी आपला भोसे गड शाबुत ठेवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

