पंढरपूर (प्रतिनिधी,):- कवितेचा जन्म हा कधीच सहजासहजी होत नसला तरी सर्जनशील व्यक्तीने जीवन जगत असताना वैविध्यपूर्ण क्षणांची नोंद ही हृदयात करायला हवी आणि त्यातील काही प्रभावी व अनोख्या नोंदी काव्य रूपात मांडायला हव्यात. कारण माणसाच्या आयुष्यात अंगाई,पाळणा, बडबड गीत या माध्यमातून सर्व प्रथम कविता येते. आजच्या युगात कोणालाही कोणाशीही बोलायला वेळ नाही. या आभासी दुनियेमध्ये विविध प्रकारचे साहित्य हे संवाद साधण्याचे व संस्कार करण्याचे उत्तम माध्यम आहे, असे मत सुप्रसिध्द कवी दुर्गेश सोनार यांनी व्यक्त केले. ते येथील कवी रवि वसंत सोनार यांच्या सखीसोबती….क्षणवैविध्यांची गुंफण या अनोख्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी बोलताना साहित्यिक व प्रकाशक घनश्याम पाटील म्हणाले की, प्रत्येक माणसाचं आयुष्य ही एक कादंबरी असते, पण हे सर्व कागदावर उमटतेच असे नाही. कवितेच्या चार ओळीमध्ये दहा अग्रलेखांचे सामर्थ्य असते आणि अशा सामर्थ्यवान कविता रवि सोनार यांनी सखीसोबती…. क्षणवैविध्यांची गुंफण या काव्यसंग्रहातून वाचकांसमोर मांडल्या आहेत.
रवि सोनार यांच्या सखीसोबती….क्षणवैविध्यांची गुंफण या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक शिवाजीराव बागल, शब्दकळा साहित्य संघाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, सुप्रसिध्द अनुवादक रविंद्र गुर्जर, साहित्यसेतू संस्थेचे अध्यक्ष प्रा.क्षितिज पाटुकले, शिवप्रज्ञा प्रकाशनचे प्रकाशक राजेंद्र भोसले आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी
प्रा.शिवाजीराव बागल व शशिकांत जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रीतभाव कविसंमेलन घेण्यात आले. यामध्ये सचिन कुलकर्णी, रावसाहेब साठे, दादासाहेब खरात, राजेंद्र झुंबर भोसले,गणेश गायकवाड, सौ.शोभा माळवे, सौ.संगीता मासाळ, सौ.योगिनी ताठे आदि कवींनी कविता सादर केल्या.
कवी रवि सोनार यांनी प्रास्ताविक केले. तर अंकुश गाजरे यांनी सुत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंढरपूरातील साहित्यिक व रवि सोनार मित्र मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले.

