वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी साहित्यिकाची आगळीक
पंढरपूर 13 एप्रिल
आजच्या युगात प्रत्येक माणसाच्या जीवनात टी.व्ही, कॉम्प्युटर, आणि स्मार्टफोन या गोष्टी अविभाज्य झाल्या आहेत. प्रत्येक व्यक्ती टी.व्ही, सिरीयल, व्हाटसअप आणि फेसबुक तसेच मोबाईलमधील विविध गेमस्च्या प्रचंड प्रेमात आहे. आणि यामुळेच की काय प्रत्येक व्यक्तीचे पुस्तके व इतर अवांतर वाचन कमी होताना दिसून येत आहे. ही बाब निश्चितच काळजी करणारी आहे.
परंतु वाचाल तर वाचाल हे वास्तव जाणलेल्या येथील साहित्यिक मंडळींनी यावर उपाय म्हणून वेगवेगळ्या समारंभाच्या औचित्याने पुस्तके भेट देण्याची योजन आखली असल्याचे दिसून येते. याचाच एक भाग म्हणून येथील ‘शब्दांकुर साहित्य वर्तुळचे’ अध्यक्ष रवि वसंत सोनार यांनी त्यांच्या स्वत:च्या वाढदिवसाचे औचित्याने जाहिरातीचे फलक, फटाके व हार तुरे या अनावश्यक खर्चाला फाटा देत येथील प्रा.डॉ.द.ता.भोसले सार्वजनिक वाचनालय येथे प्राचार्य शिवाजीराव बागल व कवी सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते पुस्तके भेट दिली. तसेच येथील नवरंगे बालकाश्रमाच्या मुला मुलींसाठीही सुनिल उंबरे, शंकर कदम, भगवान वानखेडे, संजय रणदिवे आदी पत्रकारांच्या हस्ते वैविध्यपुर्ण पुस्तके भेट दिली. भेट दिलेल्या पुस्तक संचात महाराष्ट्रातील ववेगवेगळ्या भागातील नावंत साहित्यीकांची आणि चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेली दर्जेदार पुस्तके आहेत.
रवि सोनार यांचा हा प्रयत्न छोटासा असला तरीही इतर जाणकारांकडून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी असे समाजोपयोगी उपक्रम राबविले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.



