![]()
पंढरपूरकरांनो सावधान..! आरोग्य सांभाळा!! पंढरपूर शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य..!
धुळीतील जंतुसंसर्गामुळे फुफ्फुसाचे विकार, ब्रॉनसायटीस, अॅलर्जी, दमा, न्युमोनिया व नेत्रविकार असे गंभीर आजार होतात..!
पंढरपूर लाईव्ह, स्पेशल रिपोर्ट:- दि. 23 एप्रिल 2017
पंढरपूर शहरात बर्याच वर्षापासुन रखडलेली रस्त्यांची कामे, झाली ती निकृष्ट दर्जाची कामे, सातत्याने शहरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्ते व परिसराची न होणारी स्वच्छता… आदी कारणांमुळे सध्या पंढरीत सर्वत्र धुळीचे लोट उडताना आढळत आहेत..! आधीच वाढता उकाडा व त्यात वार्याच्या झोतासोबत अंगावर येणारे धुळीचे लोट यामुळे नागरीकांना नाक आणि तोंड दोन्ही दाबुन पंढरीत वावरावे लागत आहे. पंढरपूर शहरातील विविध रुग्णालयात श्वसनाचे विकार आणि नेत्रविकार असणारे रुग्णांची गर्दी वाढत आहे.
पंढरपूर शहरातील नागरिकांसह येथे येणार्या वारकरी भाविकांमधुन पंढरपूर शहरातील खराब झालेले रस्ते, धुळीचे अस्वच्छतेचे वाढलेले साम्राज्य याबाबत प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदत आहे. गेल्या दशकापासून भुवैकुंठ पंढरी नगरीतील कांही प्रमुख रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. कांही ज्या रस्त्यांची दुरुस्ती झाली ती अतिशय निकृष्ट दर्जाची झाली. येथील लिंक रोड, प्रदक्षिणा मार्ग, महावीर नगर परिसर, गोविंदपुरा व दोन्ही रेल्वे पुलाखालच्या मार्गाची दुरुस्ती ज्या -ज्या कंत्राटदारांनी केली त्यांनी फक्त या कामाद्वारे आपले ‘उखळ’ पांढरे करण्याचे काम केले आहे. याबाबत वारंवार ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या माध्यामातुन आम्ही आवाज उठवलेला आहे. आम्ही संबंधीत प्रशासकीय अधिकार्यांच्या निदर्शनास सुध्दा ही बाब वेळोवेळी आणुन दिली आहे. परंतु या मार्गांची दुरावस्था ‘जैसे थे’ आहे. शहरातील अंतर्गत मार्गांसोबतच उपनगरातील मार्गांचीही अशीच दैन्यावस्था आहे.
ऊन्हाळ्यात दुरुस्त केलेले रस्ते पावसाळ्यात पुन्हा नादुरुस्त होतात. या रस्त्यांच्या कामासाठी ठेकेदाराने वापरलेल्या निकृष्ट दर्जाच्या डांबर व इतर निकृष्ट मटेरियलमुळे असे घडते हे कोणीही सांगु शकेल. या कामांसाठी खर्ची पडणारा निधी म्हणजेच जनतेचा कष्टाचा पैसा हा ठेकेदारांच्या घशात जातो.. मात्र या निकृष्ट कामामुळे नाकीतोंडी धुळ जाऊन नागरिकांच्या व वारकरी भाविकांच्या घशात मात्र दुखायला लागते! रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना मणक्यांचे आजार जडलेत. या शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर मात्र राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी सर्वजणच मुग गिळून गप्प बसलेले आढळुन येतात. एखाद्या मार्गाचे कामाचा शुभारंभ दणक्यात केला जातो. पुढार्यांचे फोटोसह बातम्या झळकतात. मात्र कांही महिन्यातच या रस्त्यांची वाट लागते. पुन्हा नव्याने टेंडर निघते, पुन्हा तोच ठेकेदार या मार्गाचे काम घेतो आणि आपली तिजोरी भरतो! असा सारा सावळा गोंधळ चालु आहे.
वास्तवीकत: ज्या मार्गाचे काम करायचे असते त्या मार्गाच्या कामाबाबतची इत्यंभुत माहिती असणारा फलक (ज्या मध्ये ठेकेदाराचे नांव, मार्गाचे अंतर, क्वालिटी, काम पुर्ण करण्याचा कालावधी अशी माहिती) लावणं बंधनकारक असतं. सर्वसामान्य करदात्या नागरिकांना आपल्या शहरात खर्ची होणार्या निधीबाबत माहिती देणं हे कर्तव्य जाणुन बुजून टाळलं जातं. पंढरपूरकरांच्या व नागरिकांच्या दुर्दैवाने अशा भोंगळ कारभाराबाबत जाब विचारणारे सत्ताधार्यांचे विरोधक, सामाजिक संघटना, संस्था सुध्दा फक्त बघ्याचे काम करत असल्याने सर्वकाही आळी मिळी गुप्प चिळी असं चाललंय..! नागरिकांच्या मनात मात्र याबाबतचा संताप खदखदत आहे. आम्ही पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून नागरिकांच्या मनातला हाच संताप मांडण्याचा प्रयत्न करतोय एवढंच.
पंढरीतील तज्ञ डॉक्टरांची पंढरपूर लाईव्ह ला माहिती.. धुळीमुळे होताहेत गंभीर आजार…!
धुळ व त्यामधील जंतुसंसर्गामुळे श्वसनाचे आजार, फुप्फुसाचे आजार, उदा. ब्रॉनसायटीस, अॅलर्जी, दमा, न्युमोनिया, असेे अनेक गंभीर आजार होतात. धुळीमुळं डोळ्याचे विकार, डोळे जळजळणे, डोळे लाल होणे असे नेत्रविकारही होतात! अशी माहिती ‘पंढरपूर लाईव्हशी’ बोलताना पंढरीतील तज्ञ डॉक्टरांनी दिली. खराब रस्त्यांमुळे चार चाकी वाहनांच्या मागुन उडणारी धुळ नाकातोंडात गेल्याने अनेकांना श्वसनाचे विकार जडत आहेत. डोळ्यात धुळ गेल्याने नेत्रविकारातही वाढ होताना आढळत आहे. खोकला, घसा दुखी, दमा आदी विकार खुप घातक असतात. असे वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांचे म्हणणे आहे. सध्या पंढरीत अशा रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहितीही समोर येत आहे. ही बाब अतिशय गंभीर असुन पंढरपूरकरांनी शहरातील धुराळ्यापासुन स्वत:चा बचाव करण्यासाठी आता रस्ते दुरुस्ती अथवा शहरातील स्वच्छतेची वाट न बघता कांही बाबतीत स्वत:ची काळजी स्वत:च घेणे आवश्यक आहे.
पुढील प्रमाणे घ्या काळजी..!
*दुचाकीवरुन प्रवास करताना तोंडाला व नाकाला मास्क बांधावा, डोळ्यांवर चष्मा अथवा गॉगल घालावा. विशेषत: लहान मुले आणि वयोवृध्दांनी आपल्या नाका, तोंडात, डोळ्यात धुळ जाणार नाही याची काळजी घ्यावी. रस्त्यांवरील खडड्यातुन आपली वाहने कमी स्पीडने व काळजीपुर्वक चालवावीत. आपल्या परिसराची स्वच्छता आपणच करावी.




