Pandharpur Live
शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटील यांची टीका
कोल्हापूर – शेतक-यांच्या नावाने खासदार राजू शेट्टी यांची निव्वळ नौटंकी सुरू असून त्यांना सत्तेची ऊब लागली आहे, अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.
शेतक-यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रघुनाथदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये ऊसाला दर जास्त आहे. त्यामुळे राज्यातल्या ऊस उत्पादकालाही सध्याच्या दरापेक्षा १ हजार रुपये जादा दर मिळावा अशी मागणी करत ही मागणी पूर्ण झाली नाही तर येत्या १० मे रोजी कोल्हापूरमधल्या साखर सहसंचालक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा रघुनाथदादांनी दिला.
शेतकरी संकटात आहे. ऊसाला भाव नाही, कांदा, तुरीचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र शेतक-यांचे नेते म्हणविणारे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यावर मुग गिळून बसले आहेत. सत्तेत गेल्यानंतर राजू शेट्टी यांना शेतक-यांचा विसर पडला असून, विरोधक आणि राजू शेट्टी दोघेही विदूषकासारखे वागत आहेत. राजू शेट्टी हे खासदार आहेत त्यांच्याकडे संसदीय आयुध आहेत. ते सत्तेतही सहभागी आहेत मग ते रस्त्यावर का उतरत आहेत? असा शेट्टींना अडचणीत टाकणारा प्रश्नही रघुनाथ दादांनी विचारला आहे.
राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातला वाद आता जगजाहीर झाला असून, या दोघांनी शेतक-यांचे हित पाहणे सोडले असल्याचा आरोपही त्यांनी केला. विरोधी पक्षांची संघर्षयात्रा आणि सत्ताधा-यांनी संवाद यात्रा दोन्हीही केवळ दिखाव्यासाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

