👁 10 Views

तलाठी कार्यालयात 50 ची पावती झाली 500ची

वाघोली- बॅंकेच्या कर्जाची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी 500 रुपयांची मागणी करून ध्वजनिधीची 50 रुपयांची पावती तलाठी कार्यालयाच्यावतीने दिली जात आहे. विशेष म्हणजे तलाठ्यांचा सही शिक्‍यानिशी असलेल्या ध्वजनिधीच्या पावतीची मुदत दि. 30 नोव्हेंबर 2016 मध्येच संपली असून 50 रुपयांच्या पावतीवर एक शून्य वाढवून 500 करण्याचे काम येथील कर्मचाऱ्याने केले आहे. किरकोळ-किरकोळ कारणांसाठी पैसे उकळणारे वाघोलीच्या तलाठी कार्यालयात कर्मचारी करीत असलेला गैरकारभार उघडकीस आला आहे.
वाघोली येथील तलाठी कार्यालयामध्ये सातबाऱ्यावर पतसंस्थेतून कर्ज काढल्यामुळे त्याची नोंद करण्यासाठी वाघोलीतील नागरिक नारायण केरू दिघे शुक्रवार (दि.12) कार्यालयात गेले होते. पतसंस्थेचे पत्र तेथील कर्मचाऱ्याला नोंदीसाठी दिल्यानंतर कर्मचाऱ्याने 500 रुपयांची मागणी केली. 500 रुपये दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने ध्वजनिधीच्या 50 रुपयांच्या पावतीवर एक शून्य वाढवून 500 रुपये केले. तलाठी संजय भोर यांची सही व शिक्का असलेली 500 रुपयांची ध्वजनिधीची पावती दिघे यांना देण्यात आली. विशेष म्हणजे देण्यात आलेल्या पावतीची मुदत दि. 7 डिसेंबर 2015 ते 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत असतानाही दि. 12 मे 2017 ही पावती दिली गेली आहे. कर्मचाऱ्याने 50च्यापुढे एक शून्य वाढवून दिलेल्या पावतीची मुदत संपलेली आहे हे पाहण्याची तसदी देखील घेतली गेलेली नाही. सुरुवातीला कामाच्या गडबडीमध्ये सदरचा फसवणुकीचा प्रकार दिघे यांच्या लक्षात आला नव्हता. संध्याकाळी पावती तपासल्यानंतर त्यांनी पावती बाबतचा प्रकार माध्यमांच्या समोर सांगितला.
वाघोली येथील तलाठी कार्यालयामध्ये कामानिमित्त आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून येथील कर्मचारी पैशांची अपेक्षा करीत असतात. जो जास्त पैसे देईल त्याचे काम सर्वात प्रथम करण्याचा तडाखा याठिकाणी सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस यामध्ये भरडला जात आहे. नारायण दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांचा हा गैरकारभार उघड झाला आहे. याबाबत वरिष्ठांना निवदेन देणार असल्याचे ग्रामस्थ विकास हरगुड यांनी सांगितले.
तलाठ्यांचे निलंबन करावे
वाघोली येथील तलाठी संजय भोर यांच्याकडे केसनंद गावचे कामकाज देण्यात आले आहे. केसनंद येथे पुढील काही दिवसामध्ये पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीच्या प्रारूप मतदारयादी मध्ये तलाठी यांनी चुकीच्या पद्धतीने वार्ड क्रमांक 3 मध्ये मतदारांची नावे वाढविल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. या तक्रारीनुसार झालेल्या 114 मतदारांची नावे कमी करण्यात आली आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही वरिष्ठांकडून कारवाई केली जात नसल्याने तलाठ्यांचे निलंबन करावे, अशी मागणी केसनंदचे ग्रामस्थ विकास हरगुडे यांनी जिल्हाधिकारी आणि हवेली उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सदरची पावती माझ्या कार्यालयाची आहे. याबाबत चौकशी केली असता कार्यालयातील कर्मचारी नामदेव चव्हाण यांनी मला कोणतीही कल्पना न देता सर्व प्रकार परस्पर केला आहे. एक वर्षापूर्वी सही व शिक्‍यानिशी सदरच्या पावत्या तयार करण्यात आल्या होत्या. यापुढे कर्मचाऱ्याकडून असे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल. केसनंदच्या प्रारूप मतदार यादी संदर्भात ग्रामस्थांनी हरकती घेतल्या आहेत. याची चौकशी तहसीलदार यांच्याकडे सुरू असून काय निर्णय झाला, याची माहिती नाही.
– संजय भोर, तलाठी, वाघोली.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *