-कामठी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन-उद्घाटन
-वीजपुरवठा यंत्रणा भूमिगत करणार : बावनकुळे
-विधानसभा मतदारसंघात २७०४ कोटींच्या कामांचे भूमिपूजन
कामठी, २१ मे
देशात आज बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी समस्या आहे. नेत्यांची सत्तेच्या माध्यमातून विकास साधण्याची योग्य दिशा असेल तर गरिबी, बेरोजगारी या समस्या दूर करता येतात. फक्त जात आणि पंथ यांच्या पुढे जाऊन विचार करता आला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते महामार्ग, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
कामठी येथील नगर परिषदेच्या प्रांगणात आयोजित विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऊर्जा मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. व्यासपीठावर खा. कृपाल तुमाने, ऍड. सुलेखा कुंभारे, जि. प. अध्यक्ष निशा सावरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, नपचे अध्यक्ष शहाजहॉं, मुख्य अभियंता विनय देशपांडे, कामठी शहर अध्यक्ष विवेक मंगतानी, माजी अध्यक्ष मनीष वाजपेयी, भाजपा नेते विकास तोतडे, अजय कदम, मोबीन पटेल, अनिल निधान आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले, कामठी आणि परिसरात कोट्यवधीची कामे होत आहेत. भांडेवाडी येथे कचर्यापासून वीजनिर्मिती करणार्या प्रकल्पासाठी कामठीतील कचरा आम्ही नेऊ. कामठी २ भाजीबाजार, मटन मार्केट, फिश मार्केट करता आले तर नगर परिषदेने करावे. सार्वजनिक वाहतुकीसाठी इथेनॉलवर चालणारी बस, इलेक्ट्रिकवर चालणारी रिक्षा, ई ऑटोचे युग आता आहे. पेट्रोल-डिझेल बंद झाले पाहिजे. समाजातील एकाही गरिबाच्या घरी स्वयंपाकासाठी लाकूड, कोळसा आणि रॉकेलचा वापर केला जाणार नाही अशी स्थिती आम्हाला आणायची आहे. गरिबांसाठी फुकटात घरे बांधायची आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरे बांधली जात आहेत. पहिल्या टप्प्यातील १० हजार घरांचे काम सुरू झाले आहे. मेट्रो रेल्वे कामठीपर्यंत आणण्याची मागणी आपण पूर्ण करणार आहोत. याशिवाय कामठीत ड्रेनेज लाईन आणि औद्योगिक विकासाच्या योजना बनवा. आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.
वीजपुरवठा यंत्रणा भूमिगत करणार : बावनकुळे
कामठी शहर आणि परिसरात २७०० कोटी रुपयांची विकास कामे सुरू झाली आहेत. ऊर्जा मंत्री म्हणून आपण कामठीतील वीजपुरवठा करणारी संपूर्ण यंत्रणा भूमिगत करणार आहोत, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. १२०० कोटींचा रिंगरोड मिळाला आहे. एनएचएआयने ३० कोटी रुपये दिले आहे. राज्य शासनाने २५० कोटी दिले असून त्या कामांनाही सुरुवात झाली आहे. कामठीला नागपूरजवळील सर्वात सुंदर शहर बनविण्याची योजना बनविली जात आहे, असे सांगून बावनकुळे यांनी येत्या २७ मे रोजी गडकरींच्या ६० व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहाण्याचे आवाहन केले.
खा. कृपाल तुमाने व ऍड. सुलेखा कुंभारे यांचीही यावेळी भाषणे झालीत. या कार्यक्रमापूर्वी भिलगाव संयुक्त पाणीपुरवठा योजना व रनाळा येरखेडा संयुक्त पाणीपुरवठा योजनांचे व कामठीतील उच्चदाब व लघुदाब वाहिनीचे भूमिगत वाहिनीत रूपांतर करण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





