👁 9 Views

रजनीकांतची जुलैमध्ये राजकारण प्रवेशाची घोषणा?

बेंगळुरू, २७ मे 
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे जुलै महिन्यात राजकारणातील प्रवेशाची घोषणा करू शकतात, अशी माहिती त्यांचे बंधू सत्यनारायणराव गायकवाड यांनी आज शनिवारी दिली.
सत्यनारायणराव बंगळुरूमध्ये राहतात. रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करावा अशी लोकांची इच्छा आहे. चाहते आणि हितचिंतकांशी चर्चेची पहिली फेरी त्यांनी पूर्ण केली आहे. राजकीय प्रवेशाची अधिकृत घोषणा करण्याआधी जून आणि जुलैमध्ये चर्चेच्या आणखी काही फेर्‍या होतील, असे सत्यनारायणराव यांनी सांगितले. अलीकडेच रजनीकांत यांनी सलग चार दिवस आपल्या चाहत्यांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी त्यांनी राजकीय प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर सत्यनारायणराव यांचे विधान महत्त्वाचे ठरणार आहे. चार दिवसांतील चाहत्यांबरोबरच्या भेटीत रजनीकांत यांनी अनेक राजकीय विधाने केली. त्यामुळे तामिळनाडूतील राजकारण चांगलेच ढवळून निघाले.
काही संघटनांनी रजनीकांत यांच्या कन्नड असण्यावर आक्षेप घेत त्यांच्या राजकीय प्रवेशाला विरोध केला. पोझ गार्डन येथील रजनीकांत यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांची प्रतिमा जाळण्यात आली. या आंदोलनानंतर दुसर्‍याच दिवशी रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करावा यासाठी चेन्नईमध्ये मोर्चा निघाला होता. सध्याच्या परिस्थितीत राज्यव्यवस्था लोकांचा विचार करत नाही. हे चित्र बदलले पाहिजे. ‘तुमच्यासारख्याच माझ्याकडे जबाबदार्‍या आणि कामे आहे. आपण आपले काम करत राहू पण जेव्हा वेळ येईल तेव्हा युद्धासाठी तयार राहा’ असे रजनीकांत आपल्या समर्थकांना म्हणाले होते.
या दौर्‍यात त्यांनी नाव न घेता द्रमुकवरही टीका केली होती. २१ वर्षांपूर्वी एका पक्षाला पाठिंबा देऊन आपण चूक केली असे रजनी म्हणाले होते. १५ मे ते १९ मे या चार दिवसात रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या १५ जिल्ह्यातील आपल्या चाहत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. गेल्या चार दशकातील तामिळनाडूचा इतिहास बघितला तर, लोकप्रिय व्यक्तींनीच इथले सत्ता सिंहासन संभाळले आहे. त्यामुळे रजनीकांत यांचे असंख्य चाहते त्यांच्या राजकीय प्रवेशाची वाट पाहत आहेत.
कमल हसनचा अप्रत्यक्ष पाठिंबा
चेन्नई : तामिळनाडूचे नेतृत्व करण्यासाठी तामिळ व्यक्तीच का हवी? असा प्रश्‍न उपस्थित करीत अभिनेता कमल हसन याने आज अप्रत्यक्षपणे सुपरस्टार रजनीकांत यांचे समर्थन केले. तामिळनाडूचे नेतृत्व तमिळ व्यक्तीनेच करावे का? असा प्रश्‍न कमल हसन यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले आहे. गांधी, नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या व्यक्ती आपल्याकडे नेते म्हणून होऊन गेल्या आहेत, ते तामिळी होते का ? त्यांना लोकांनी स्वीकारले नाही का?, असा प्रतिप्रश्‍न हसन यांनी पत्रकारांना विचारला. दक्षिणेतील लोक अजूनसुद्धा या नेत्यांची नावे आपल्या मुलांना देतात, याकडेही त्याने लक्ष वेधले. नुकत्याच झालेल्या तामिळ बीग बॉसच्या ट्रेलर प्रदर्शन कार्यक्रमात ते माध्यमांशी बोलत होते. तामिळ बीग बॉसचे सूत्रसंचालन कमल हसन करणार आहे. 



                              सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *