मोदी सरकारला गेल्याच महिन्यात तीन वर्षे पूर्ण झाली.
यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराच्या एका मागून एक उघड झालेल्या प्रकरणांमुळे देशातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला भरभरून मतं दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार सत्तेत आले. या सरकारला गेल्याच महिन्यात तीन वर्षे पूर्ण झाली. देशातील भ्रष्टाचार कमी व्हावा, यासाठी मोदी सरकारने अनेक प्रयत्न केले, तरीही त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय अहवालावरून हे स्पष्ट झाले आहे. आशिया खंडात भ्रष्टाचारामध्ये आजही भारताचा क्रमांक पहिलाच असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
‘अॅंटी करप्शन ग्लोबल सिव्हिल सोसायटी ऑर्गेनाझेशन’च्या ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या अहवालामध्ये भारत आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट देश असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अर्थात या अहवालात नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांचा उल्लेख करण्यात आला असून, त्यामुळे भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसला असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर देशातील लोकांना अजूनही नरेंद्र मोदी यांच्याकडून खूप अपेक्षा असल्याचेही अहवालात म्हटले आहे. नरेंद्र मोदी घेत असलेल्या निर्णयांमुळे भविष्यात भ्रष्टाचार नक्की संपेल, असाही आशावाद भारतीयांना वाटत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
या सर्वेक्षणात एकूण १६ देशांतील २१,८६१ लोकांशी जुलै २०१५ ते जानेवारी २०१७ या कालावधीत चर्चा करण्यात आली. भ्रष्टाचाराबाबत त्यांचे मत काय आणि त्यांचा अनुभव काय हे या चर्चेतून जाणून घेण्यात आले. अहवालानुसार, या १६ देशांमधील सुमारे ९० कोटी लोकांनी त्यांची सरकारी कामे करून घेण्यासाठी लाच दिली आहे. लाच देण्याचे प्रमाण प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे आहे. यामध्ये जपानचे स्थान सर्वात खाली असून, भारताचे स्थान सर्वात वरचे आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६९ टक्के भारतीय लोकांनी आपली सरकारी कामे करवून घेण्यासाठी लाच दिल्याचे सांगितले.
भारतामध्ये लाचखोरीचे प्रमाण आजही सर्वात जास्त असले तरी केंद्रात एकाच पक्षाचे स्थिर सरकार असल्यामुळे आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांचासारखा शासक असल्यामुळे देशवासियांना खूप अपेक्षा आहेत. मोदींनी घेतलेल्या निर्णयामुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असे भारतीयांनी या सर्वेक्षणात सांगितल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याउलट दक्षिण कोरियामध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण खूप कमी आहे. तरीही तेथील लोकांचा सरकार खूप कमी विश्वास आहे. भ्रष्टाचार संपवण्यासाठी सरकार फार काही करू शकणार नाही, असे दक्षिण कोरियातील लोकांना वाटते, असे अहवालात म्हटले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





