👁 9 Views

चीन पाकिस्तानात लष्करी तळ उभारू शकतो; अमेरिकेचा भारताला धोक्याचा इशारा

आफ्रिकेत चीनकडून नौदल तळाची उभारणी सुरु

संग्रहित छायाचित्र

चीन भविष्यात पाकिस्तानमध्ये स्वत:चा लष्करी तळ उभारु शकतो, अशी शक्यता अमेरिकेच्या संरक्षण विभागाने वर्तवली आहे. अमेरिकेच्या संरक्षण दलाने एका अहवालाच्या माध्यमातून चीनच्या पुढील कारवायांचा आणि हालचालींचा अंदाज व्यक्त केला आहे. पाकिस्तानमध्ये चीनकडून लष्करी तळ उभारला जाण्याची भीती अमेरिकेने व्यक्त केली आहे. अमेरिकेने व्यक्त केलेला हा अंदाज भारतासाठी धोक्याची घंटा आहे.
चीनकडून सध्या आफ्रिका खंडातील जिबुती या देशात एका नौदल तळाची निर्मिती केली जाते आहे. याच धर्तीवर अनेक देशांमध्ये चीनकडून लष्करी तळ तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने अमेरिकेच्या संसदेला ९७ पानांचा वार्षिक अहवाल सादर केला आहे. ‘चीनने संरक्षण अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळेच संरक्षण क्षेत्रात चीनकडून प्रचंड प्रमाणात खर्च केला जातो आहे.’ असे अमेरिकेन संरक्षण विभागाने अहवालात नमूद केले आहे.
२०१६ मध्ये चीनने संरक्षण क्षेत्रासाठी १४० अब्ज डॉलरची तरतूद केली होती. मात्र संरक्षण क्षेत्रावरील एकूण खर्च १८० अब्ज डॉलरपेक्षाही अधिक होता. ‘चीनच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावला असला, तरीही भविष्याचा विचार करुन चीनने संरक्षण क्षेत्रावरील खर्च कायम ठेवला आहे,’ असे अमेरिकेन संरक्षण विभागाने अहवालात म्हटले आहे. या अहवालात चीनकडून आफ्रिका खंडातील जिबुतीमध्ये उभारल्या जाणाऱ्या नौदल तळाचा संदर्भ देण्यात आला आहे.
‘जिबुतीमध्ये उभारण्यात येणारा नौदल तळ हा परदेशात उभारला जाणारा चीनचा पहिलाच नौदल तळ आहे. जिबुतीमध्ये अमेरिकेचा लष्करी तळ आहे. सामरिकदृष्ट्या हा तळ अतिशय महत्त्वाचा आहे. जिबुतीच्याच धर्तीवर चीनकडून पाकिस्तानमध्ये लष्करी तळाची उभारणी केली जाऊ शकते. पाकिस्तानसोबत चीनचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि सामरिकदृष्ट्या पाकिस्तानमधील लष्करी तळ चीनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरु शकतो,’ असे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने अहवालात नमूद केले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111               


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *