👁 10 Views

इंदापूरकरांनी दिला संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला निरोप



निमगाव केतकी ः प्रतिनिधी

खेळ मांडियेला वाळवंटी घाई ।
नाचती वैष्णव भाई रे ॥
क्रोध अभिमान गेला पावटणी ।
एक एका लागतील पायी रे ॥ 1 ॥
गोपीचंदन उटी तुळसीच्या माळा ।
हार मिरविती गळां ॥
टाळ-मृदुंग घाई पुष्प वर्षाव ।
अनुपम्य सुखसोहळा रे ॥ 2 ॥
 
जगद‍्गुरू संत तुकाराम महाराजांचा लाखो वैष्णव भक्तांचा मेळा मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूरनगरीतील ऐतिहासिक गोल रिंगण व येथील  बारावा मुक्काम आटोपून बुधवारी (दि. 28) सकाळी पुणे जिल्ह्याचे व इंदापूर तालुक्याचे शेवटचे टोकातील सराटी गावाकडे मुक्कामासाठी प्रस्थान केले. या वेळी इंदापूरकरांनी तुकोबारायांचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती. गुरुवारी (दि. 29) पालखीचा मुक्काम सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावात आहे. 
बुधवारी पहाटे पाच वाजता इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णाजी यादव, अर्बन बँकेचे अध्यक्ष भरत शहा, कैलास कदम, मंगेश पाटील, अनिकेत वाघ यांसह इंदापूरवासीयांनी व सोहळाप्रमुखांनी काकडा आरती झाल्यानंतर पालखी सकाळी सहा वाजता शहरातून हरिनामाचा गजर करीत पंढरीच्या विठूरायाला भेटण्याच्या ओढीने निघाली.  पालखी सोहळ्यात  खासदार छत्रपती संभाजी महाराज व राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील पायी चालत  सोहळ्यात सहभागी झाले होते. 
इंदापूर शहरातील युवा क्रांती प्रतिष्ठानने चरण सेवा तसेच आईसाहेब रिक्षा स्टॉप, रचना उद्योगसमूह, जागृती सेवा प्रतिष्ठान, महात्मा फुले मित्रमंडळ, धनंजय वाशिंबेकर   मेमोरिअल ट्रस्ट, अखिल मंडई मित्रमंडळ, भैरवनाथ 
मित्रमंडळ,  चाणक्य मंडळ, जय भवानी मंडळ, मुस्लिम समन्वय समिती,  उमेश पवार मित्रमंडळ, लायन्स क्लब करसल्लागार ग्रुप, छत्रपती शिवाजी मंडळ, नेताजी 
मित्रमंडळ, अपंग बहुउद्देशीय संस्था, बागवान जमात यांसह शहरातील अनेक सेवाभावी संस्था आणि मंडळांनी वारकरी  अन्नदान, अल्पोपहार, चहापाणी वाटप, आरोग्य सेवा आदी  माध्यमांतून वैष्णव भक्तांची  सेवा केली. 
इंदापूर शहरातील कैलासवासी अजित ढवळे मित्र परिवार यांच्या वतीने सकाळी पालखी सोहळा मार्गस्थ होताच बाळा ढवळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावातील   कचरा उचलून स्वच्छता केली. कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयीन विद्यार्थीवर्गानेही शहरात स्वच्छता केली. 
होतो जयजयकार गर्जत अंबर ।
मातले हे वैष्णव वीर रे ॥
तुका म्हणे सोपी केली पायवाट ।
उतरावया भवसागर रे ॥ 4 ॥
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळींप्रमाणेच पालखी सोहळा मार्गक्रमण करत आहे. इंदापूर शहरातून पालखी सोहळा मुख्य बाजारपेठ खडकपुरा, नेहरू चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनगर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगरमधून जोतिबा मंदिरापासून जोतिबाच्या माळावरून पुढे मुख्य रस्त्याला लागून विठ्ठलवाडीकडे निघाला. या वेळी इंदापूरवासीयांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती व जड अंतःकरणाने पालखीस निरोप देत होती. विठ्ठलवाडी, गलांडवाडी नंबर दोनच्या ग्रामस्थांनी सोहळा गावाच्या वेशीवर येताच स्वागत केले व सकाळची न्याहारी येथेच झाली. गावातील अनेकांनी अल्पोपाहार दिला. पुढे वडापुरी गावात पालखी तासभर विसावली. सुरवड वकीलवस्तीतून पुढे बावडा गावात दुपारचे भोजन आणि नंतर तालुक्यातील शेवटचे गाव सराटीत मुक्कामी विसावली. गुरुवारी सकाळी निरा नदीत पादुका स्नानानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करून माळशिरस तालुक्यातील अकलूज गावात मुक्कामी आहे. तेथेच तिसरे गोल रिंगण होणार आहे.  
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *