आजपर्यंत पंढरपूर देवस्थानसाठी चार विकास आराखडे तयार झाले. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही झालेली दिसत नाही. या चार आराखड्यांचे नेमके काय झाले, याची श्वेतपत्रिता महिन्यात काढणार असून, नवीन विकास आराखडा तयार करून तो प्रभावीपणे राबविणार आहे,’ अशी ग्वाही पंढरपूर देवस्थान समितीचे नूतन अध्यक्ष व भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
पंढरपूर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. अतुल भोसले यांनी ‘लोकमत’च्या कऱ्हाड कार्यालयाला गुरुवारी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून डॉ. भोसले यांनी अभिवादन केले. यावेळी कृष्णा कामगार सोसायटीचे अध्यक्ष पै. आनंदराव मोहिते, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, उमेश शिंदे, नगरसेवक हणमंत पवार, मलकापूरचे नगरसेवक हणमंतराव जाधव, धनाजी माने, हर्षवर्धन मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘पंढरपूर देवस्थानच्या समितीचे अध्यक्षपद हे सामाजिक कार्याचे पद असून, येथे सेवक म्हणून मला काम करण्याची संधी अनपेक्षितपणे लाभली. हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण आहे. पंढरपूर देवस्थानच्या गतिमान विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा आग्रही आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या देवस्थानचा आम्हाला कायापालट करायचा आहे. देवस्थानाबाबत आत्तापर्यंत चार विकास आराखडे तयार करण्यात आले. १९९५, १९९९, २००५ आणि २००८ साली हे आराखडे तयार झाले. मात्र, आराखड्यांबाबत पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे या आराखड्यांची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला आहे. श्वेतपत्रिका काढल्यानंतर सर्वांना विश्वासात घेऊन नवा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. येत्या काही दिवसांत आढावा बैठक घेऊन येथील सोयी- सुविधांचा मागोवा घेतला जाईल. शाश्वत विकासासाठी आणि भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी येत्या काही दिवसांत आम्ही बैठक घेणार आहोत. या बैठकीतून देवस्थानच्या सर्वांगीण विकासाचे मुद्दे समोर घेऊन चर्चा होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझी निवड करण्याबरोबरच आयुक्त चंद्रकांत दळवी यांना या देवस्थानचा विकास गतिमान करण्यासाठी स्वतंत्र सक्षम अधिकारी देण्याची सूचना केली असून, प्रांताधिकारी संजय तेली यांची यासाठी नियुक्ती केली आहे.
पालखी मार्गावर दरवर्षी निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत नुकतीच चर्चा होते. यापूर्वी पालखी महामार्ग तयार करण्याबाबतचाही निर्णय झाला होता. मात्र, हे निर्णय फक्त चर्चेपुरतेच राहिले. पालखी मार्ग निर्धाेक होण्यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत. काही प्रमुख वारकऱ्यांना सोबत घेऊन बैठक घेतली जाणार आहे. त्यावेळी पालखी मार्गाबाबतच्या सूचना त्यांच्याकडून घेतल्या जातील.
राज्याला मोठी संत परंपरा आहे. ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचे काम लाखो वारकरी करीत आहेत. बदल हा निसर्गाचा नियम असल्याने तरुणांच्या वाढत्या संख्येने वारीतील शिस्त बिघडते, असं म्हणणं चुकीचं आहे. वास्तविक, तरुणांचा वारीतील वाढता सहभाग ही मोठी सुखावह बाब आहे. तरुणांनी वारीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी यापुढे देवस्थानच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.
दादांनी दखल घेतली, हेच खूप झालं!
तुमची निवड झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या निवडीला विरोध करीत तुमच्यावर टीका केली, याबाबत छेडले असता ‘अजितदादा आमचे मित्र आहेत. त्यांच्याजवळ असताना त्यांना दखल घ्यायला वेळ मिळाला नाही. मात्र, आज ते माझी दखल घेतायत. हेच माझ्यासाठी आनंददायी आहे. त्यांच्या मनातील शंकांची उत्तरे मी प्रत्यक्ष चांगले काम करूनच त्यांना देईन,’ असे डॉ. भोसले यांनी सांगितले.
विरोध करणाऱ्यांची मनं
मी नक्कीच जिंकेन….
‘कोणत्याच एका नावावर एकमत होणं, ही बाब खूप अवघड असते. समितीच्या अध्यक्षपदी वारकरीच हवा, अशी मागणी कोणी करीत असेल तर त्याला गैर म्हणता येणार नाही. मात्र, एका वारकऱ्याच्या नावावरही एकमत होणं शक्य वाटत नाही. पंढरपूर देवस्थानची सेवा करण्यासाठी तिथे चांगले काम करण्यासाठी वारकरीच असला पाहिजे, असं काही नाही. मनोभावे सेवा करण्याचं ठरविलेली कोणीही व्यक्ती तिथे चांगले काम करू शकते. येणाऱ्या काळात मी कामातूनच विरोध करणाऱ्यांची मनं जिंकेन,’ असे डॉ. अतुल भोसले म्हणाले.
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा











