इंग्रजांना विजय मिळवून देणाऱ्या सैनिकांना मानवंदना
पेशवाईच्या काळात माणसांना गुलामाची व पशुवत वागणूक देणाऱ्या अस्पृश्यासारख्या अमानुष प्रथेने कळस गाठला होता.
भीमाकोरेगाव लढाईचा द्विशताब्दी महोत्सव; इंग्रजांना विजय मिळवून देणाऱ्या सैनिकांना मानवंदना
पुणे जिल्ह्य़ातील हवेली तालुक्यातील भीमाकोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज सैन्य व मराठा सैन्य यांच्यात घनघोर लढाई झाली. त्यावेळी गुलामगिरीची वागणूक दिल्या जाणाऱ्या अस्पृश्य समाजातील ५०० सैनिक इंग्रजाच्या बाजूने लढले. त्या लढाईत मराठा सैनिकांचा पराभव झाला आणि अखेरचे आचके देणाऱ्या पेशवाईचाही अस्त झाला. या लढाईत विजयश्री खेचून आणणाऱ्या व धारातीर्थी पडलेल्या अस्पृश्य सैनिकांची स्मृती म्हणून इंग्रजांनी तेथे उभारलेल्या विजयस्तंभाच्या परिसराचा राज्य सरकारच्या वतीने विकास करण्यात येणार आहे. तसेच १ जानेवारी २०१८ रोजी भीमाकोरेगावच्या लढाईच्या द्विशताब्दीनिमित्त सरकारच्या वतीने खास कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे. एका अर्थाने पेशवाईच्या पराभवाचाच सरकारी जल्लोष होणार आहे.
पेशवाईच्या काळात माणसांना गुलामाची व पशुवत वागणूक देणाऱ्या अस्पृश्यासारख्या अमानुष प्रथेने कळस गाठला होता. त्याचा प्रतिकार म्हणून त्यावेळी भीमाकोरेगाव येथील लढाईत ब्रिटिशांच्या ‘बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री’च्या तुकडीतील ५०० महार सैनिक इंग्रजांच्या बाजूने लढले. त्यावेळी मराठा सैनिकांचे नेतृत्व दुसऱ्या बाजीरावांकडे होते. महार सैनिकांच्या अतुलनीय शौर्याच्या आधाराने अवघ्या ७००-८०० सैनिकांच्या जोरावर इंग्रजांनी २८ हजार सैनिकांची कुमक असलेल्या पेशव्यांचा पराभव केला, अशी इतिहासात नोंद आहे. त्यानंतर पेशवाईचा अस्त झाला आणि इंग्रजांची राजवट सुरू झाली. त्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या महार सैनिकांच्या स्मरणार्थ इंग्रजांनी भीमाकोरेगावच्या युद्धभूमीवर जयस्तंभ उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा तेथे भेट देऊन त्या जयस्तंभाला मानवंदना दिली. त्यानंतर आता दर वर्षी १ जानेवारीला हजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी भीमाकोरेगावला जाऊन जयस्तभंला मानवंदना देतात. ती आता परंपराच बनली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित याआधी दीक्षाभूमी, चैत्यभूमी व अन्य स्थळांचा विकास करणे, त्यांचे स्मारकात रूपांतर करणे असे अनेक निर्णय सरकारी पातळीवर घेतले गेले. परंतु भीमाकोरेगावच्या परिसराचा विकास करणे किंवा जयस्तंभाला स्मारकाचा दर्जा देण्याचा यापूर्वीच्या सरकारने विचार केला नाही. भाजपपासून कायम राजकीय अंतर राखून राहणाऱ्या दलित समाजाला आपलेसे करण्यासाठी केंद्रात व राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्मारके उभारण्याचा, त्यांच्याशी संबंधित स्थळांचा विकास करण्याचा सपाटाच लावला आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या सूचनेनुसार भीमाकोरेगाव येथील जयस्तंभाच्या परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालात इंग्रज व मराठा सैनिकांच्या लढाईचा संदर्भ देण्यात आला आहे. हवेली तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात पेशव्यांच्या विरोधात लढलेल्या महार सैनिकांच्या शौर्याच्या सन्मानार्थ ब्रिटिश सरकारने जयस्तंभ उभारल्याच्या नोंदीचा दाखला दिला आहे. त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे, अशी माहिती बडोले यांनी दिली. १ जानेवारी २०१८ ला भीमाकोरेगावच्या ऐतिहासिक लढाईला दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त जयस्तंभाच्या परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर येत्या १ जानेवारीला शासनाच्या वतीने खास कार्यक्रमही घेण्यात येईल, असे सामाजिक न्यायमंत्र्यांनी सांगितले.
प्रस्तावित विकासस्थळांच्या यादीत भीमाकोरेगावचाही समावेश
आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचे निमित्त करून राज्यातील भाजप सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाची ठिकाणे-स्थळांचा विकास करण्याचा व त्यांना पर्यटनाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार २४ मार्च २०१७ रोजी २८ स्थळांची यादी निश्चित केली. ही यादी आता ५० स्थळांपर्यंत गेली आहे. मंगळवारी ४ जुलै रोजी मंत्रालयात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्या यादीत भीमाकोरेगावचाही समावेश करण्यात आला.
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा











