हजारो समर्थकांसह उदयनराजेंचं साताऱ्यात शक्तीप्रदर्शन
22 Jul. 2017
सातारा: खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर काल (शुक्रवारी) रात्री उशीरा उदयनराजे अचानक साताऱ्यात आले. यावेळी हजारो समर्थकांच्या साथीनं त्यांनी साताऱ्याच्या रस्त्यावरुन चालत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. दरम्यान, उदयनराजे आता स्वत: पोलीस ठाण्यात हजर होणार का? याबाबत सध्या सातारकरांना उत्सुकता लागली आहे. या शक्तीप्रदर्शनाच्या क्षणी एक मात्र नक्कीच जाणवले की..”राजाचं राजपण.. कालपण.. आजपण.. उद्या पण!! “
लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे.
उदयनराजे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण हायकोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता उदयनराजे स्वत: पोलीस ठाण्यात हजर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आले.
पदयात्रेदरम्यान आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे भोसले यांचीही धावती भेट घेत विचारपूस केली. या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून सध्या चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान, या पदयात्रेवेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चक्क फटाकेही फोडले. रात्री उशिरा उदयनराजे पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण अद्याप तरी उदयनराजे पोलिसांसमोर हजर झालेले नाहीच. आज ते हजर होण्याची शक्यता आहे.
जाहिरात
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111











