पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
22 Jul. 2017
सोलापूर : शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ लुटण्याचेच काम झाले आहे. शेतकर्यांनी देशाला पुरेल इतके अन्नधान्य पिकवले, उत्पादन वाढवलं, पण शेतकर्यांचे उत्पन्न वाढले नाही. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करून शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेेते रघुनाथ पाटील यांनी ३० जूनपर्यंत कर्ज घेतलेल्या सर्वच शेतकर्यांचे कर्ज सरकारने माफ करून शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी केली. किसान क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाटील यांनी सभेत शेतकर्यांना मार्गदर्शन केले. २३ जुलै रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात शेतकर्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी व्यासपीठावर माकपचे माजी आ. नरसय्या आडम, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर, सुकाणू समितीचे सदस्य डॉ. अजित नवले, करण गायकवाड, गणेश कदम, सुशीला बोराडे आदी उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले, एक एकर शेत टॅ्रक्टरने नांगरणी करण्यासाठी ३० लिटर डिझेल लागते.
या डिझेलच्या माध्यमातून शेतकरी ४५० रुपयांचा कर अप्रत्यक्षपणे शासनाकडे जमा करतो. त्यामुळे कर्जमाफी ही शेतकर्यांना मिळणारी भिक किंवा उपकार ठरत नाही. स्वामीनाथ आयोगाने लागू केलेल्या शिफारसीनुसार शेतकर्यांना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या सूत्रानुसार हमीभाव देण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.शेतकर्यांनी कर्ज काढून पत्ते किंवा गोट्या खेळले नाहीत. शेतकर्यांना झालेलं कर्ज म्हणजे आजपर्यंतच्या सरकारच्या पापाची फळंच आहेत.
त्यामुळं धोरण बदला अन्यथा डुंगणावर लाथा बसतील. शेतकर्यांच्या कर्जाबरोबरच शेतमजुरांच, शैक्षणिक कर्ज माफ करण्यात यावे, अशीही मागणी पाटील यांनी यावेळी केली. यावेळी माजी आ. आडम म्हणाले, एक किलो गहू पिकवण्यासाठी शेतकर्यांना १८ रुपये खर्च येतो.
बाजारात गहू विकून शेतकर्यांना प्रती किलो १२ रुपये मिळत असतील, तर जगाच्या पोशिंदाने जगावे कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदी हे महान जादूगार आहेत. नोटा बंद करुन उलट बोगस नोटा चलनात आले. स्वीस बँकेतून काळा पैसा आणण्याचे सोडून भलत्याच ठिकाणी डोकं लावण्यात आलं.
आमदारांना ५० हजार पेन्शन देता मग शेतकर्यांना का नाही, पंजाबमधील शेतकर्यांनाही आत्महत्या करण्याची का वेळ आली? याचे आत्मचिंतन सरकारने करणे गरजेचे आहे. मात्र हे नेते रात्री मंत्र्यांच्या घरात दिसतात. शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी पोलिसही रस्त्यावर उतरणार नाहीत, असे आंंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची योजना ही ऐतिहासिक फसवेगिरीची योजना आहे. अटी व शर्ती घालून केलेली दीड लाखांची बोळवण म्हणजे सरकारचा बावळटपणा आहे. नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना काहीच देण्यात आले नाही. सर्व शेतकर्यांचे सर्व कर्ज माफ व्हावे, यासाठी आंदोलन अधिक तीव्र करणे आवश्यक असून हा लढा आता प्रत्येक गावातील तरुणाचा झाला आहे.
देशाने आतापर्यंत जातीय व प्रांतीय कट्टरवाद पाहिला. मात्र आता शेतकर्यांच्या पोरांचा कट्टरवाद दिसेल, असे मत यावेळी सुकाणू समितीचे नाशिकचे सदस्य डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केले.संजय पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संपात फूट पाडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र डॉ. नवले यांच्यासारख्या शेतकरी नेत्यांमुळे शेतकरी हिताचे आंदोलन पूर्ण न्याय मिळेपर्यंत पुढे चालणार आहे. राज्य शासनाने उसाला ठिबक सक्तीचे केले आहे, हा निर्णय चांगला आहे, मात्र शेतकर्यांना पाच रुपये उसाला दर देण्यात यावा. शेतकरी स्वखर्चाने ठिबक करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी दिलीप धोत्रे, सविता शिंदे, कैलास धनवाले, गणेश कदम, सुशीला बोराडे आदींचीही जोशपूर्ण भाषण झाले.
या सभेसाठी किसान सभा, बळीराजा शेतकरी संघटना आदींसह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











