पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना व्हायरसमुळे लावलेला लॉकडाऊन संपल्यावर घरी जायला मिळेल, या आशेने हजारो मजूर सकाळपासूनच मुंबईतल्या वांद्रे स्टेशनवर जमले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. तसंच माघारी जाता येणार नाही, असं पोलीस आता त्यांना सांगत आहेत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
त्यामुळे या स्थलांतरितांची तारांबळ उडाली आहे. आपल्या गावी परत जाण्याची ओढ आणि कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव यात अडकलेल्या मजुरांना आता कसं इथून हटवावं, हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा झाला होता. 3 मे पर्यंत देश लॉकडाऊन झाल्यामुळे या स्थलांतरितांना त्यांच्या गावाकडे परत पाठवणं अशक्य असल्याने पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.
अचानक जमा झालेल्या या तुफान गर्दीमुळे मात्र सोशल डिस्टंग्सिन्सचा फज्जा उडाल्याचे दिसुन आले. मुंबई पोलिसांनी या जमावाला पांगवण्यासाठी दाखवलेलं धैर्य आणि प्रयत्न मात्र कौतुकास्पदच ठरले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आवाहन
“मी सगळ्या कामगार आणि मजूर वर्गाला विनंती करतो की कायदा आणि सुव्यवस्था यांची बंधनं पाळा. तुम्ही सध्या आहात तिथेच थांबा, तुम्हा सगळ्यांना निवारा आणि अन्न मिळेल याची व्यवस्था केली जाईल. तुम्ही तुमचा संयम सोडू नका. तुम्हाला घरी जायचं आहे हे मी समजू शकतो. तूर्तास मुंबई सोडू नका” असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यातही मुंबईत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १६० जणांचा मृत्यू हा करोनाची लागण झाल्याने झाला. अशा सगळ्या परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाउनची मर्यादा वाढवण्यात आली आहे. मागच्या शनिवारीच महाराष्ट्रातला लॉकडाउन हा ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाउन कायम असेल असं सांगितलं. तसंच लॉकडाउनचे नियम आणखी कठोर होतील असंही त्यांनी सांगितलं.
अखेर या सगळ्या गोष्टी सहन न झाल्याने गावी जाण्यासाठी वांद्रे स्टेशन बाहेर हजारोंच्या संख्येने कामगार वर्गाने गर्दी केली होती. आम्हाला आमच्या घरी जायचं आहे ही मागणी त्यांनी केली आणि त्यासाठी विशेष ट्रेन सोडा अशीही मागणी त्यांनी केली होती.

