👁 12 Views

Corona Virus Update- देशातील व महाराष्ट्रातील एकंदर परिस्थिती… देशभरात नव्या १७५२ रुग्णांची भर

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- 

केंद्राच्या यंत्रणा युद्धपातळीवर राबत असल्या तरी करोनाबाधितांची संख्या आटोक्यात येण्यात अपयश येत आहे. शुक्रवारी देशभरात नव्या १७५२ रुग्णांची भर पडली असून ही देशात एक दिवसात नोंदविण्यात आलेली सर्वात मोठी संख्या आहे.

अहमदाबाद, सुरत, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांत सर्वाधिक रुग्ण असल्यामुळे या भागात पाहणी आणि नियंत्रणासाठी केंद्राची चार नवी पथके स्थापन करण्यात आली असून ठाण्यावरही नजर असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील रुग्णसंख्या २३,४५२ झाली आहे. त्यात शुक्रवारी एका दिवसात १७५२ रुग्णांची भर पडली. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४८१३ आहे.

टाळेबंदी लागू केली नसती तर देशातील करोनाबाधितांचा आकडा एक लाखांहून अधिक असला असता. त्यामुळे टाळेबंदी योग्य वेळी अमलात आणली गेली, असे उच्चाधिकार गट-क्रमांक (१)चे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

करोनाबाधितांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता २०.५७ टक्क्यांवर पोहोचले असून गेल्या २८ दिवसांमध्ये एकही रुग्ण न आढळलेले जिल्हे १५ झाले आहेत. तर ८० जिल्ह्य़ांमध्ये गेल्या १४ दिवसांमध्ये नवा रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशभरात ९.४५ लाख संशयितांना देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे प्रमुख ए. के. सिंह यांनी दिली. या लोकांमध्ये करोनाची लक्षणे दिसली तर त्यांची तातडीने नमुना चाचणी घेऊन उपचार केले जातील, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यांमधील आरोग्यमंत्र्यांशीही चर्चा केली. देशामध्ये समूह संसर्ग झाल्याचे अद्याप तरी आढळलेले नसून करोनाचा तिसरा टप्पा टाळण्यात यश मिळाल्याचे दिसत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्थिती काय? : शुक्रवारी देशात १७५२ नवे रुग्ण आढळले, संपूर्ण देशातील रुग्णसंख्या २३,४५२ झाली आहे. मुंबईत ३५७ नव्या रुग्णांची, तर ११ बळींची नोंद झाली. राज्यात ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ६८१७ झाली आहे. राज्यातील चाचणीसंख्या लाखांवर गेली आहे.

ठाण्यावरही नजर
करोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती अहमदाबाद, सुरत, हैदराबाद आणि चेन्नई यांसारख्या मोठय़ा शहरांमध्ये गंभीर असल्याचे केंद्राने शुक्रवारी सांगितले. या शहरांतील बाधितांची संख्या एकत्रितरीत्या ५ हजारांहून अधिक आहे. त्यामुळे केंद्राकडून आधी पाठविण्यात आलेल्या पथकांसह चार नवी पथके या शहरांत पाठविण्यात येणार आहेत. तसेच ठाणे जिल्ह्य़ातील बाधितांची संख्या चिंताजनक असल्याने या शहरावर सध्या नजर ठेवली जात आहे. ठाणे जिल्ह्य़ातील बाधितांचा आकडा हा ५४२ आहे.

महाराष्ट्रातील रूग्णसंख्या व एकुणच परिस्थिती…
राज्यात आजपर्यंत कोरोनाच्या 1 लाख 2 हजार 189 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 94 हजार 485 जणांचे नमुने निगेटिव्ह, तर 7221 जण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना चाचण्यांतील बाधितांची टक्केवारी ही 6.96 टक्के असल्याचे समोर आले आहे. राज्यात शुक्रवारी कोरोनाबाधित 394 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 7221 झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी 117 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 957 झाली आहे. 5559 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सध्या राज्यात 1 लाख 19 हजार 161 लोक होम क्वारंटाईन आहेत. त्यापैकी 8,814 लोक संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात शुक्रवारी 18 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 301 झाली आहे. 18 मृतांपैकी मुंबई येथील 11, पुणे येथे 5 तर मालेगाव येथील दोघांचा समावेश आहे. मृतांमध्ये 12 पुरुष तर 6 महिला आहेत.

18 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 9 रुग्ण आहेत, तर 6 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 3 रुग्ण 40 वर्षांखालील आहेत. या 18 मृत्यूंपैकी 12 रुग्णांमध्ये (67 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यू दराचा विचार केला तर सध्या राज्यातील कोरोना आजाराचा मृत्यू दर हा 4.4 टक्के आहे.

राज्यातील 269 मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता 50 वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यू दर हा कमी आढळून येतो, विशेषतः, 21 ते 30 वर्षे वयोगटात मृत्यू दर 0.64 टक्के इतका आहे तर त्यापुढील वयोगटात मृत्यू दर वाढताना दिसून येतो. 61 ते 70 या वयोगटात मृत्यू दर सर्वाधिक म्हणजे 17.78 टक्के एवढा आहे. यामुळे 50 वर्षांवरील आणि इतर अतिजोखमीचे आजार असणार्‍या व्यक्तीमध्ये कोरोना आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असल्याचे अधोरेखित झाले आहे.

मुंबईत नवे 357 रुग्ण
महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन जारी होऊन शुक्रवारी बरोबर एक महिना होत असतानाच मुंबईत कोरोनाचे 357 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 4908 वर पोहोचली. तर 11 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोना बळींची संख्या 179 वर पोहोचली. दिलासा देणारी बातमी म्हणजे, गेल्या 24 तासांत तब्बल 122 जण बरे झाले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी मुंबईतील विविध हॉस्पिटलमध्ये 359 जणांना दाखल करण्यात आले. त्यापैकी 189 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, 21 ते 22 एप्रिल या दोन दिवशी खासगी प्रयोगशाळेमध्ये कोरोनाची चाचणी करण्यात आलेल्या संशयित रुग्णांपैकी 168 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 357 वर पोहोचली. तर आतापर्यंत 4 हजार 589 जणांना कोरोनाची लागण झाली. मुंबईत आतापर्यंत 595 लोक बरे झाले. तर 179 जणांचा मृत्यू झाला आहे.

एशियन हार्ट हॉस्पिटलचे 13 कर्मचारी पॉझिटिव्ह
देशातील नामांकित असलेले वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एशियन हार्ट हॉस्पिटलमधील 13 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. या पॉझिटिव्हमध्ये रुग्णालयातील नर्स, वार्डबॉय आणि इतर कर्मचारी यांचा समावेश आहे. या हॉस्पिटलमधील 140 जणांची पालिका एच. पूर्व विभागाने कोरोना विषाणूची टेस्ट केली होती. या टेस्टचा रिपोर्ट शुक्रवारी आला. रुग्णालयातील 140 कर्मचारी कोरोना टेस्टसाठी स्वत:हून पुढे आले होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *