सोलापूर दि. 25 : कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मे व जून 2020 या महिन्याकरीता अंत्योदय अन्न योजना व अन्नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव धान्य दुकानातून ग्रामीण भागात धान्य वितरणास सुरवात करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
केशरी कार्ड धारकांना यापूर्वी शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसे. पण लॉकडाऊनमूळे मे आणि जून महिन्यासाठी प्रती व्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदुळ देण्याचा निर्णय घेतला आहे. गहू 8 रुपये प्रति किलो, तांदुळ 12 रुपये प्रति किलो दराने वितरित करण्यात येणार आहे, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील केशरी कार्ड धारकांना 42 हजार 80 क्विंटल गहू आणि तांदुळ वितरित करण्यात येणार आहे. त्यापैकी 21 हजार 540 क्विंटल धान्यांची उचल करण्यात आली आहे. एक दोन दिवसात पूर्ण धान्यांची उचल केली जाईल. त्यानंतर शहरातील केशरी कार्ड धारकांना धान्य वितरण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
रास्तभाव दुकाने पोलीसांच्या सूचनांप्रमाणे पूर्ण वेळ सुरु राहतील, रास्तभाव धान्य दुकानांत पुरेसा धान्यसाठा उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या धान्याचे वितरण लाभधारकांना 31 मे पर्यंत करण्यात येणार असल्याने धान्य घेण्यासाठी गर्दी करु नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
रेशनकार्ड धारकांच्या तक्रार निवारणासाठी 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. कार्डधारकांना धान्य वाटप करण्याचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. सर्व स्वस्त धान्य दुकानदारांकडून कार्डधारकांना वेळनिहाय धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. स्वस्त धान्य दुकानदारांकडून कार्डधारकांना धान्य घेऊन जाण्यासाठी वेळ दिली जाईल. त्यानुसार दिलेल्या वेळेतच दुकानामध्ये जाऊन धान्य घ्यावे. लाभार्थ्यांनी धान्य घेताना सोशल डिस्टन्स ठेवावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी केले आहे.

