👁 11 Views

मराठवाड्यात जलप्रलय | गोदावरी नदीचे सर्व बंधारे भरून वाहू लागले; महापुराच्या भीतीने थरकाप!

 


Pandharpur Live:

गोदावरी नदीवरील सर्व बंधारे तुडुंब भरले असून काठावरील गावांचा महापुराच्या भीतीने थरकाप उडाला आहे. पावसाच्या रौद्र रुपामुळे लाखो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच फुलशेती आणि पिकांना जबर तडाखा बसला आहे.

जिल्ह्यात रविवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी रात्रीपासून झालेल्या धुवांधार पावसाने गोदावरी नदीला महापूर आला आहे. दुधना व पूर्णा नदीलाही महापूर आला आहे. जिल्ह्यातील येलदरी व निम्न दुधना ही मोठी धरणे भरली गेली आहेत. याशिवाय ढालेगाव, तारूगव्हाण, मुदगल, डिग्रस हे उच्च पातळी बंधारे आणि झरी, करपरा, मासोळी, मुळी व पिंपळदरी हे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

गोदावरी नदीवरील तारूगव्हाण-पोहनेर गावानजीकचा बीड आणि परभणी जिल्ह्याला जोडणारा हा पुल आता पाण्याखाली गेला असुन पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज (मंगळवार) पहाटेपर्यंत जोरदार सुरू होता. त्यामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. धरणे, उच्च पातळी बंधारे, मध्यम प्रकल्प व साठवण तलाव इत्यादींमधून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने छोट्या नदी-नाल्यांना ही पूर आला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गोदावरी पूर्णा व दुधना या नद्यांसह आणि उपनद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसाने गोदावरी नदीपात्रातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. गोदावरी नदीचे पात्र अक्षरशः दुथडी भरून वाहत असून गंगाखेड जवळ गोदावरी नदीच्या पात्राने धोक्याची पातळी गाठली आहे.

विष्णुपुरी, लिंबोटी, सिद्धेश्वर, दुधना, येलदरी, माजलगावसह इतर लहानमोठय़ा धरणांचे दरवाजे उघडून नदीपात्रात प्रचंड विसर्ग करण्यात येत आहे. गोदापात्र फुगले असून बॅकवॉटरमुळे नांदेड जिह्याला कोणत्याही क्षणी महापुराचा वेढा पडण्याची शक्यता आहे. परभणी, बीड, जालना, संभाजीनगर, हिंगोली, लातूर तसेच धाराशीव जिह्यात अखंड पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गोदावरीच्या काठावरील नुर्सिंह मंदिर तसेच धार्मिक विधीसाठीचा घाट पूर्णतः पाण्याखाली आहे.

गोदावरीच्या या पुराने गंगाखेड तालुक्यातील झोला, पिंपरी, मसला या गावांमधून बॅक वॉटर चे पाणी मोठ्या घुसले आहे, त्यामुळे गंगाखेड ते झोला रस्ते वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी नदीचा पूर आला आहे. या पुराने गंगाखेड ते कौंडगाव हा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. इळेगाव ते गंगाखेड हा मार्गही बंद आहे. दरम्यान या तालुक्यातील सायाळा,सुनेगाव आरखेड, मुळी, नागठाणा, आरखेड आदी गावातील संपर्क तालुका स्थानापासून पूर्णतः तुटला आहे. सुनेगाव जवळ इंद्रायणी नदीचा मोठा पूर आला आहे, त्यामुळे त्या भागातील आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे. या तालुक्यात गेल्या काही तासातील पावसाने मोठा गोंधळ उडवला आहे, दरम्यान गोदावरी नदीचे वाहणारे पाणी,पूर पाहण्याकरीता गोदावरी तटावर नागरिकांची पावसात मोठी गर्दी उसळत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *