👁 5 Views

लग्नास नकार दिल्याच्या रागातून त्या महिलेचा निर्घृण खून

 कोल्हापूर : अनैतिक संबंधातून तरुणाने महिलेचा धारदार कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना कसबाबावडा लाईन बाजार परिसरात शहाजीनगरात रविवारी घडली.


कविता प्रमोद जाधव (वय ४४, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. भर मध्यवस्तीत दुपारी घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली.

संशयित आरोपी राकेश शामराव संकपाळ (वय ३२, रा. शहाजीनगर) हा स्वत:हून पोलीस मुख्यालयातील ‘एलसीबी’ मध्ये हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली. लग्नास नकार दिल्याने रागाच्या भरात तिचा खून केल्याची कबुली संशयिताने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कविता जाधव ही कसबा तारळे येथे राहते. त्यांना दोन मुली व एक मुलगा असून पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. राधानगरी येथे मावसभावाच्या फुटवेअर दुकानात त्या कामास होत्या, शिवणकामही करून उदरनिर्वाह करत होत्या. नात्यातील अविवाहीत राकेश संकपाळ याच्याशी त्यांचे सूत जुळले. दोघांच्या संबधांची नातेवाईकांना कल्पना होती. राकेशने तिला आपल्यासोबत लग्न करण्याचा तगादा लावला; पण, त्या लग्नाला नकार देत होत्या.



रविवारी सकाळी संशयित राकेशने आपल्या आई- वडिलांना देवदर्शनाला गावी पाठवले. भाऊ नेहमीप्रमाणे नोकरीला गेला. त्यावेळी कविता ही मावसभावासोबत राकेशच्या घरी आल्या. त्यानंतर भाऊ परत तारळेला निघून गेला. दुपारी राकेशने कविताला पुन्हा लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिने तीन मुले असल्याने लग्नास नकार दिला, दोघांत वादावादी झाली. रागातच राकेशने घरातील धारदार कोयत्याने तिच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले. त्यात ती जागीच ठार झाली.

घटनेनंतर संशयित आरोपी राकेश संकपाळ स्वत:हून नजीकच्या पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेच्या कार्यालयात हजर झाला, त्याने खून केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो.नि. संजय गोर्ले, सहा.पो.नि. किरण भोसले, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी आदींनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचे दृश्य विदारक होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *