👁 8 Views

मुलाला गरम चटके देणाऱ्या माता – पित्यावर गुन्हा दाखल

 

स्वतःच्या पोटच्या मुलाला त्याच्याच माता-पित्याने अमानुष मारहाण करून चमचा, चाकू आणि कात्रीने गरम चटके दिल्याचा खळबळजनक प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वयोवृद्ध आजीच्या तक्रारीवरून तिच्याच मुलासह सुनेविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.


लवकरच या माता-पित्याची पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.


६५ वर्षांची वयोवृद्ध महिला तिचे पती, मुलगा, सून तसेच १३ आणि ७ वर्षांच्या नातवांसोबत दादर परिसरात राहते. त्यांचा दिवा येथे स्वतःचा फ्लॅट असून गेल्या १२ वर्षांपासून ती तिच्या पतीसोबत तिथेच राहत होती. गेल्या महिन्यापासून ती दादर येथे मुलाच्या घरी राहायला आली होती. तिचा मुलगा काहीच कामधंदा करीत नसून त्यांच्या मालकीचे दोन गाळे आणि दोन फ्लॅट आहेत. 


या फ्लॅटसह गाळ्यांच्या भाड्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. तिचा १३ वर्षांचा नातू दादरच्या एका नामांकित शाळेत सहावीत शिकतो. त्याने त्याच्या मोबाईलवर देवाची गाणी लावली होती, परंतु मोबाईल घेतल्याच्या रागातून त्याला त्याच्या आईने बेदम मारहाण केली.


यावेळी त्याच्या आजीने मध्यस्थी करून त्याला बाजूला करीत त्याची विचारपूस केली. यावेळी त्याने आपली कैफियत मांडली. आई-वडील आपल्याला नेहमीच घरातील कामे करण्यास सांगतात. काम केले नाही तर पट्ट्याने बेदम मारहाण करतात.

 आई चमचा, चाकू आणि कात्री गरम करून अंगावर, मांडीवर आणि पायाला चटके देते. इतकेच नव्हे तर वारंवार सांगूनही आईवडील शाळेची फी भरत नाहीत. शाळेतील वह्या-पुस्तके घेऊन देत नाहीत. अनेकदा शाळेतही पाठविले जात नाही, अशी व्यथा त्याने मांडली.

आजीने त्याच्या अंगावर तपासले असता तिला त्याच्या अंगावर चटके दिल्याच्या ठिकठिकाणी भाजल्याच्या जखमा दिसून आल्या. या प्रकारानंतर तिने दादर पोलीस ठाण्यात तक्रार केली. 


आजीच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी तिच्याच मुलासह सुनेविरुद्ध मारहाणीसह अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *