👁 9 Views

सोलापूर: शेळगीत अपघातात युवती ठार

 

शहरातील शेळगी परिसरातील महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर आलेल्या मालट्रकनेे समोरून रेणार्‍या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षातील एक युवती गंभीर जखमी होऊन मरण पावली.


इतर सातजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला. मिसबा शुकूर मुलाणी (वय 14) असे मरण पावलेल्या युवतीचे नाव आहे; तर मुजीर पठाण (24), रुक्साना (50), जन्नत, मोहम्मद साद (7), हसीना (7), गुड्डो मन (5), नौशाद (32, सर्व रा. सोलापूर) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


वरील सर्व जखमी व मृत हे सर्वजण शुक्रवारी दुपारी एम.एच. 13 एएफ 2209 या क्रमांकाच्या रिक्षातून शेळगी येथील कुमारस्वामी नगर येथून शाहजहूर अली दर्गा येथे दर्शनासाठी जात होते. 


परमशेट्टी मिल चौक ते पुणे-हैद्राबाद महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरून रिक्षा जात असताना अ‍ॅग्रो मिलच्या पाठीमागे समोरून आलेल्या एमएच 43 बीपी 8788 क्रमांकाच्या मालट्रकने रिक्षाला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, रिक्षा पूर्णपणे चेमटून गेली.


रिक्षातील सर्व प्रवासी हे रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक जागीच सोडून पळून गेला. जोडभावी पेठ पोलिसांनी तसेच जमलेल्या नागरीकांनी जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले. 


रुग्णालयात उपचार सुरु असताना मिसबा मुलाणी ही युवती मरण पावली. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत गुन्हा दाखल झाला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *